लोकसभेतील दारुण पराभवाबद्दल लक्ष्य झाल्यानेच बहुधा महाराष्ट्र, हरयाणासह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीत पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी अद्याप तरी पुरेसे सक्रिय झालेले नाहीत.  
लोकसभेतील दारुण पराभवाची कारणमीमांसा करण्याकरिता ए. के. अ‍ॅन्टोनी समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल सादर झाल्यावर सध्या काँग्रेसमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. समितीने राहुल गांधी यांच्यावर खापर फोडलेले नसले तरी त्याचा अर्थ तसाच काढला जात आहे. सध्या पक्ष सोडून जाणारे सारेच नेते राहुल यांना दोष देत आहेत. जनार्दन द्विवेदी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने राहुल यांनाच टोमणा हाणला. ‘कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे, असा सल्ला द्विवेदी यांनी पक्षनेतृत्वाला उद्देशून दिला. वर्षांनुवर्षे पक्षाची प्रभावीपणे बाजू मांडणाऱ्या द्विवेदी यांना नव्या रचेनत राहुल आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी दूर केल्याने त्यांनी राहुल यांना अप्रत्यक्षपणे टोला दिल्याचे मानले जाते.
सध्या महाराष्ट्र, हरयाणा, जम्मू-काश्मिर व झारखंड या चार राज्यांत निवडणुकांची तयारी सुरू आहे. राज्यात राष्ट्रवादीने जास्त जागांसाठी दबावाचे राजकारण सुरू केले आहे. शरद पवार यांच्याशी चांगले संबंध नसल्याने राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीबाबत राहुल गांधी हस्तक्षेप करीत नाहीत, असे सांगण्यात येते. आघाडीबाबत पवार यांनी सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली आहे. पक्षातील नेत्यांकडून होणारी टीका तसेच चार राज्यांच्या निवडणुकीत पक्षासाठी वातावरण फारसे आशादायी नसल्यानेच राहुल गांधी यांनी अद्याप तरी तयारीत सक्रिय होण्याचे टाळल्याचे उच्चपदस्थांकडून सांगण्यात येते. महाराष्ट्रातील निवडणूक तयारीबाबत त्यांनी आतापर्यंत एकही बैठक आयोजित केलेली नाही. राहुल यांचे निकटवर्तीय माणिक टागोर यांच्याकडे निरीक्षक म्हणून मुंबईची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उमेदवारांची नावे निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यावरच ते लक्ष घालतील, असेही समजते. उमेदवारांची नावे निश्चित करताना राहुल यांच्याशी विचारविनिमय केला जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.