राहुल गांधी यांची खिल्ली उडविण्याची संधी शरद पवार सोडत नसत, तर पवारांबद्दलची राहुल यांच्या मनातील अढी लपून राहिलेली नव्हती. यातूनच बहुधा पवार काँग्रेससोबत असताना त्यांच्यावर कुरघोडी करण्याकरिता पवारांना प्रिय असलेल्या ‘लवासा’ प्रकल्पाला मंजुरी देऊ नये, अशी स्पष्ट सूचना राहुल गांधी यांनी केली असावी. ही बाब माजी पर्यावरणमंत्री जयंती नटराजन यांच्या पत्रातून समोर आली आहे.
काँग्रेस नेतृत्वावर तोफ डागताना माजी पर्यावरणमंत्री नटराजन यांनी पत्रात, कोणत्या प्रकल्पांच्या पर्यावरणविषयक मंजुऱ्या रोखण्याच्या सूचना राहुल गांधी यांच्या कार्यालयातून करण्यात आल्या होत्या त्याची यादीच सादर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ‘लवासा’ प्रकल्पाचा उल्लेख आहे. पुण्याजवळील ‘लवासा’ प्रकल्पाचे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी अनेकदा उघडपणे समर्थन केले होते. ‘लवासा’ प्रकल्पाला मंजुरी देण्यास होणाऱ्या विलंबाबद्दल पवार यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. ‘लवासा’ सारखे आणखी काही प्रकल्प झाले पाहिजेत, अशी भूमिकाही पवार यांनी मांडली होती. ‘लवासा’ प्रकल्पाच्या विरोधात केंद्र आणि राज्यातील काँग्रेसची नेतेमंडळी नाके का मुरडीत होती हे जयंती नटराजन यांच्या पत्रामुळे स्पष्टच झाले आहे. राहुल गांधी यांच्या कार्यालयातून ‘लवासा’ प्रकल्पाबाबत आपल्याला स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या, असा उल्लेख नटराजन यांच्या पत्रात करण्यात आला आहे.
काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी नेहमीच शरद पवार यांचा योग्य सन्मान ठेवला होता. पण राहुल गांधी यांच्या मनात पवारांबद्दल वेगळी भावना होती. महाराष्ट्रात काँग्रेस संघटना मजबूत करायची असल्यास राष्ट्रवादीला राजकीयदृष्टय़ा संपवावे लागेल हे राहुल आणि त्यांच्या निकटवर्तीयांचे मत होते. यातूनच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याची संधी सोडली नव्हती. पवारांनी समर्थन केल्यानेच राहुल गांधी यांनी ‘लवासा’चा मार्ग रोखला असावा, अशी चर्चा आहे. ‘लवासा’च्या पर्यावरणविषयक मंजुरीसाठी राज्यातून राजकीय पातळीवर बरेच प्रयत्न झाले होते. पण राहुल गांधी यांचा विरोध असल्यानेच काँग्रेसच्या संबंधितांनी मंजुरी रोखून ठेवली होती.
राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची सूत्रे गेल्यापासून काँग्रेस व राष्ट्रवादीत अंतर वाढत गेले होते. काँग्रेसबरोबर संबंध तोडण्यात या मुद्दयाची किनार असल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात येते