रेल्वे अर्थसंकल्प हा प्रगतीशील, आधुनिक आणि वास्तविकतेचे भान राखणारा आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाची प्रशंसा केली.
हा अर्थसंकल्प समजण्यास अवघड होता, अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत सेना खासदारांनी रेल्वे अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली होती. त्यावर बोलताना, शिवसेना खासदारांनी रेल्वे अर्थसंकल्प नीट ऐकला नसावा, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. लोकप्रिय घोषणा टाळण्यात आल्या असल्या तरी रेल्वे विकासात्मक परिवर्तनाची मोठी उंची गाठू शकणार आहे. गुंतवणुकीची शिस्तबध्द योजना अर्थसंकल्पात असून त्यातून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राचा चौफेर विकास साधला जाणार आहे. प्रवासी व मालवाहतुकीला चालना मिळणार असून अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे. स्वच्छतेसाठी नवीन विभाग सुरु होणार असल्याने त्यातून मोठी रोजगारनिर्मिती होईल, असे फडणवीस यांनी नमूद केले.