तिकिटाबरोबरच किरकोळ खरेदीसाठीही फायदा

तिकीट खिडकीसमोर रांग लावून महिना, तीन महिने किंवा सहा महिने मुदतीचा पास काढणाऱ्या मुंबईकरांच्या खिशात आता कागदी पासऐवजी ‘रेल कार्ड’ येणार आहे. मुंबईसह देशातील उपनगरीय प्रवाशांसाठी रेल्वे मंत्रालय हे नवीन कार्ड आणण्याच्या विचारात आहे. या संदर्भात देशभरातील ३१ बडय़ा बँकांसह चर्चा सुरू असून या कार्डचा फायदा रेल्वे तिकिटाबरोबरच किरकोळ खरेदीसाठीही होणार आहे.

रेल्वेने उपनगरीय प्रवाशांच्या सोयीसाठी कागदविरहित मोबाइल तिकीट प्रणाली सुरू केली. त्यापुढे जाऊन आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालय एकात्मिक तिकीट प्रणालीसाठीही प्रयत्न करत आहे. त्यापुढे जाऊन आता रेल्वे मंत्रालयाने देशभरातील १.१० कोटी उपनगरीय प्रवाशांसाठी हे ‘रेल कार्ड’ आणण्याची योजना आखली आहे.

या योजनेनुसार गोल्ड, सिल्व्हर आणि प्लॅटिनम अशी तीन प्रकारची कार्डे प्रवाशांसाठी उपलब्ध होतील. सिल्व्हर कार्ड हे मासिक पासधारकांना, गोल्ड कार्ड सहा महिन्यांचा पास काढणाऱ्यांना आणि प्लॅटिनम कार्ड एक वर्षांचा पास काढणाऱ्या प्रवाशांना देण्यात येईल. या तीनही कार्डाच्या धारणक्षमतेप्रमाणे त्यांना किरकोळ खरेदीतही सवलत देण्याबाबत योजना आहे. देशभरातील १.१० कोटी उपनगरीय प्रवाशांपैकी ७५ लाखांहून अधिक प्रवासी असलेल्या मुंबईत या योजनेची अंमलबजावणी प्रायोगिक तत्त्वावर केली जाणार आहे. मात्र, मुंबईतील पश्चिम व मध्य रेल्वेच्या कोणत्याही अधिकाऱ्याला अद्याप या योजनेची कल्पना नाही. मध्य रेल्वेच्या मुख्यालयातील वाणिज्य विभागातील एका बडय़ा अधिकाऱ्याला याबाबत विचारले असता त्याने एकात्मिक तिकीट प्रणाली आणि ही योजना यांची सरमिसळ करत माहिती दिली. मात्र, रेल कार्ड कदाचित रेल्वेचीच योजना असावी. तिचा एकात्मिक तिकीट प्रणालीशी काहीच संबंध नाही, असे एमएमआरडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

  • रेल्वे मंत्रालयाने देशभरातील १.१० कोटी उपनगरीय प्रवाशांसाठी हे ‘रेल कार्ड’ आणण्याची योजना आखली आहे.
  • या योजनेसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय, एचडीएफसी अशा ३१ बडय़ा बँकांशी चर्चा चालू असून या बँकांनीही या योजनेत रस दाखवल्याचे रेल्वे मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले.