सध्याच्या रेल्वेच्या वाढत्या विस्ताराचा विचार करता महानगरांच्या आसपास नवीन टर्मिनस विकसित करून तेथून लांब पल्ल्याच्या गाडय़ा सोडण्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अर्थसंकल्पात केल्यानंतर मुंबईच्या आशाही पल्लवीत झाल्या आहेत. या शहराची वाढती गरज लक्षात घेऊन मध्य आणि पश्चिम रेल्वे यांनी अशा तीन टर्मिनसचा प्रस्ताव रेल्वेकडे पाठवला होता. त्यापैकी दोन टर्मिनसला या रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरी मिळाल्याची शक्यता आहे. यात पनवेल, ठाकुर्ली आणि वसई या स्थानकांचा समावेश आहे. ही टर्मिनस सुरू झाल्यास मुंबईतील उपनगरीय वाहतुकीवर पडणारा लांब पल्ल्याच्या गाडय़ांचा ताण मोठय़ा प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
दिल्लीत पाच टर्मिनस आहेत. मुंबईची गरज त्याहीपेक्षा मोठी असल्याने येथेही अधिकाधिक टर्मिनस असणे अपेक्षित आहे. त्यासाठी मध्य रेल्वेने पनवेल आणि ठाकुर्ली येथे टर्मिनस उभारणीचा प्रस्ताव दिला होता. तर पश्चिम रेल्वेने वसई येथे टर्मिनस उभारण्याबाबत प्रस्ताव दिला. मुंबईत सध्या मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर टर्मिनस, वांद्रे टर्मिनस, मुंबई सेंट्रल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ही टर्मिनस आहेत. त्यात या तीन टर्मिनसची भर पडल्यास मुंबईकरांचा मोठा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. त्यापैकी पनवेल येथे टर्मिनस व कळंबोली येथे या गाडय़ांच्या देखभाल दुरुस्तीसाठी कोचिंग टर्मिनस यांच्या उभारणीसाठी गेल्या अर्थसंकल्पातच तरतूद झाली होती. तर ठाकुर्ली येथील टर्मिनसची उभारणी करण्याचा विचार मध्य रेल्वे करत आहे. ही टर्मिनस उभी राहिल्यास लांब पल्ल्याच्या गाडय़ांपैकी बहुतांश गाडय़ा थेट ‘सीएसटी’ व मुंबई सेंट्रल येथे येण्याऐवजी मुंबईच्या वेशीवरच थांबतील. परिणामी उपनगरीय गाडय़ांच्या फेऱ्या वाढवण्यासाठी जागा मिळेल. तसेच या लांब पल्ल्याच्या गाडय़ांचा वेळही वाचणार आहे.

महानगरांमधील वाढती वाहतूक समस्या लक्षात घेऊन या महानगरांच्या गर्भात लांब पल्ल्याच्या गाडय़ा घेऊन जाण्याऐवजी त्यांच्या वेशीवर एखादे टर्मिनस असेल.
– सुरेश प्रभू, रेल्वेमंत्री