कोणत्याही आकर्षक आणि भल्यामोठ्या घोषणा न करता पायाभूत सुविधांचा विकासावर भर देणारा २०१६-१७ साठीचा रेल्वे अर्थसंकल्प रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी लोकसभेत सादर केला. वर्षभरात सात अब्ज प्रवाशांची ने-आण करणाऱ्या भारतीय रेल्वेबद्दल सर्वसामान्यांना अभिमान वाटावा या दृष्टीने अनेक उपाययोजनांची घोषणा त्यांनी केली. यामध्ये प्रवाशांची सुरक्षा, रेल्वेतील स्वच्छता, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करतानाच लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचाच विचार सुरेश प्रभू यांनी अर्थसंकल्पात केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी प्रवासी किंवा मालवाहतुकीच्या भाड्यात कोणतीही वाढ सुचविलेली नाही.
गेल्यावर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सुरेश प्रभू यांनी कोणत्याही नव्या रेल्वेगाडीची घोषणा केलेली नव्हती. त्याऐवजी त्यांनी प्रवाशांची सुरक्षितता, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने त्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यावर आणि रेल्वेची पायाभूत सुविधा सुधारण्यावर भर दिला होता. यंदाच्या अर्थसंकल्पात त्यांनी हीच मालिका पुढे सुरू ठेवली आहे. यंदाही त्यांनी मोठ्या घोषणा केलेल्या नाहीत. पण अनेक छोट्या छोट्या निर्णयांच्या साह्याने प्रवाशांसाठी रेल्वेसेवा अधिक सुसह्य करण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्यावर्षी करण्यात आलेल्या १३९ घोषणांवर चालू आर्थिक वर्षांत काम सुरू झाले असल्याचे त्यांनी अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले. त्याचबरोबर या आर्थिक वर्षात रेल्वे ८७२० कोटींची बचत करेल, असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला. रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सात नवे अभियान त्यांनी सुरू केले असून, त्यावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष अधिकारी नेमण्यात येणार आहेत. हे अधिकारी थेट रेल्वे मंडळाच्या अध्यक्षांना आपला कार्यअहवाल सादर करणार आहेत.
चालू आर्थिक वर्षात २५०० किलोमीटरचे ब्रॉडगेज रेल्वेरुळांचे जाळे उभारण्यात आले आहे. दिवसाला १३ किलोमीटरचे ब्रॉडगेज रेल्वेरूळ टाकण्यात येत असल्याचे सुरेश प्रभू यांनी सांगितले.
अंत्योद्य एक्स्प्रेस आणि दिनदयाळ कोचेस
देशातील लांबपल्ल्याच्या मार्गांवर अत्योद्य एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहेत. या गाड्या पूर्णपणे अनारक्षित असून, त्यामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे डब्यामध्ये पाणी आणि मोबाईल चार्जिंग पॉईंट उपलब्ध करून देण्यात येतील. रेल्वे प्रवाशांसाठी दिनद्याळ डबेही तयार करण्यात आले असून, ते लवकरच मार्गावर येणार आहेत.
हमसफर, तेजस, उद्य
हमसफर, तेजस आणि उद्य या तीन नव्या रेल्वे सुरू करण्याची घोषणाही सुरेश प्रभू यांनी केली. हमसफर ही तृतीय श्रेणीची आसनव्यवस्था असलेली संपूर्णपणे वातानुकूलित रेल्वे असणार आहे. तेजस ही प्रतितास १३० किलोमीटर वेगाने धावणारी रेल्वे असून त्यामध्ये वाय-फाय, स्थानिक खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. व्यावसायिक मार्गांवर उद्य ही डबलडेकर रेल्वे चालविण्यात येणार आहे.
जननी सेवा
लहानग्यांना घेऊन प्रवास करणाऱ्या महिलांसाठी जननी सेवा सुरू करण्याची घोषणाही रेल्वेमंत्र्यांनी केली. यामध्ये मातांना रेल्वे स्थानकावर बेबीफूड, गरम दूध, गरम पाणी, मुलांचे डायपर बदलण्यासाठी रेल्वेमध्ये टेबल उपलब्ध करून देण्यात येईल
हमाल नव्हे, सहाय
देशभरात रेल्वेप्रवाशांना मदत करणाऱ्या हमालांना यापुढे सहाय असे नवे नाव देण्यात येऊन त्यांच्यासाठी नवा गणवेश आणला जाणार आहे. त्याचबरोबर सर्व हमालांचा आरोग्य विमाही उतरवला जाणार असल्याचे प्रभू यांनी सांगितले.
उपनगरीय सेवा
मुंबईतील चर्चगेट ते विरार या उपनगरीय मार्गावरील उन्नत रेल्वेसेवेसाठी लवकरच निविदा मागविण्यात येतील. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल या मार्गावरही उन्नत रेल्वेसेवा सुरू करण्याची घोषणा सुरेश प्रभू यांनी केली. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता येथील उपनगरीय रेल्वेवरील प्रवाशांचा भार कमी करण्यासाठी कार्यालयांच्या वेळा बदलण्यासाठी रेल्वे मंत्रालय राज्य सरकारशी चर्चा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
एसएमएसचा वापर
रेल्वे डब्याची स्वच्छता करून घेण्यासाठी रेल्वे प्रवासी एसएमएसचा वापर करू शकणार आहेत. प्रवाशांच्या एसएमएसनंतर तातडीने संबंधित डब्याची स्वच्छता केली जाईल. त्याचबरोबर काढलेले तिकीट रद्द करण्यासाठीही १३९ या शॉर्टकोड सुविधेचा वापर करता येणार असल्याचे सुरेश प्रभू यांनी सांगितले.