लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधून वातानुकूलित श्रेणीतून प्रवास करताना रेल्वेतर्फे आपल्याला चादरी, उश्यांचे अभ्रे, नॅपकीन आणि ब्लँकेट्स दिली जातात. प्रत्येक वेळी हे साहित्य वापरताना ते धुतले असेल का, अशी एक शंका आपल्या मनात येते. प्रत्येक फेरीनंतर हे साहित्य नुसते धुतलेच नाही, तर र्निजतुकही केले जाते याबाबत निश्चिंत राहा..

रेल्वेचा लांबचा प्रवास म्हटल्यावर स्वच्छतेचा विचार करून अनेकांच्या पोटात गोळा येतो. प्रवास शयनयान श्रेणीतून असला, तर आसने स्वच्छ असतील की नाही, इथपासून पिण्याच्या पाण्याचे काय इथपर्यंत अनेक गोष्टींचा विचार प्रवाशांना करावा लागतो. वातानुकूलित श्रेणीतून प्रवास होणार असेल, तर आसनांची काळजी नसली, तरी शौचकुपाची काळजी करावी लागते. त्यातच आणखी एका काळजीची भर पडते ती म्हणजे अंथरूण-पांघरूण यांची!

Kapil Dev Says Some people will suffer but no one is bigger than the country
Kapil Dev : “काही लोकांना त्रास होईल, परंतु देशापेक्षा कोणीही…”, कपिल देव यांनी बीसीसीआयच्या ‘त्या’ निर्णयाचे केले स्वागत
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
Sameer Wankhede on aryan Khan arrest
आर्यन खानच्या अटकेनंतर जातीवरून केलं लक्ष्य, भ्रष्टाचाराचे झालेले आरोप; समीर वानखेडे म्हणाले, “प्रत्येक गोष्टीचा संबंध…”
in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?

वातानुकूलित श्रेणीच्या डब्यांमध्ये रेल्वेकडून आसनावर अंथरायची एक चादर, अंगावर घ्यायची चादर आणि दुलई, उश्यांचे अभ्रे आणि हात-तोंड पुसण्यासाठी एक नॅपकिन हे साहित्य पुरवले जाते. विशेष म्हणजे प्रवासानंतर हे साहित्य रेल्वेला परत करावे लागते. दुसऱ्या फेरीला तेच साहित्य धुऊन पुन्हा प्रवाशांना दिले जाते. आता यात प्रवाशांना असलेली शंका म्हणजे, ‘खरेच या चादरी आणि इतर साहित्य दर वेळी धुतले जाते का’!

या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी आहे. रेल्वेने विविध विभागांमध्ये आपल्या मुख्य टर्मिनस स्थानकांजवळ अशा प्रकारच्या लिनन वॉशिंग लाँड्री सुरू केल्या आहेत. यापैकी मध्य रेल्वेची लिनन वॉशिंग लाँड्री वाडीबंदर यार्डमध्ये आहे. ही लाँड्री टनल लाँड्री म्हणूनही ओळखली जाते. या यंत्रामध्ये एका दिवसात १२ हजारांपेक्षा जास्त चादरी किंवा नॅपकिन धुण्याची क्षमता आहे. ही प्रक्रिया पाहणे खरोखर एक अनुभव असतो.

१२ कप्पे, सहा टप्पे!

या यंत्रातील १२ कप्प्यांपैकी प्रत्येक कप्प्यात ठरावीक प्रक्रिया होते. त्यात १, २ आणि ३ या तीन कप्प्यांमध्ये कपडे प्रत्येकी दोन ते अडीच मिनिटे भिजवले जातात. त्यापुढील तीन टप्प्यांमध्ये म्हणजे ४, ५ आणि सहा या कप्प्यांमध्ये रसायनांद्वारे या कपडय़ांवरील डाग काढले जातात. पुढील तीन टप्प्यांमध्ये ते पुन्हा एकदा पाण्यात खंगाळून घेतले जातात. म्हणजेच ते पाण्यात धुतले जातात. दहाव्या कप्प्यात ते र्निजतुक करण्याची प्रक्रिया केली जाते. ११व्या टप्प्यात या चादरी, अभ्रे, ब्लँकेट्स आदी गोष्टींवर भार टाकून त्या दाबून त्यातील पाणी काढले जाते. या प्रक्रियेनंतर या चादरींचा गोलाकार केक बनतो. हा केक ड्रायरमध्ये म्हणजेच १२व्या कप्प्यात पाठवला जातो. या सगळ्या प्रक्रियेतून जाण्यासाठी चादरींना साधारण ३० ते ३२ मिनिटांचा कालावधी लागतो. ब्लँकेटला लागणारा वेळ थोडा जास्त आहे.

इस्त्री आणि घडय़ा!

या यंत्रांमधून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला कडक इस्त्री केली जाते. त्यासाठी या लाँड्रीमध्ये इस्त्री करण्यासाठीची दोन यंत्रे आहेत. प्रत्येक यंत्र एका तासात तब्बल एक हजार चादरींना इस्त्री करते. म्हणजेच या लाँड्रीमध्ये एका तासात दोन हजार चादरींच्या इस्त्री व घडय़ा होतात. या यंत्रांमध्ये चादरी, नॅपकिन किंवा ब्लँकेट सरळ जावेत किंवा दुमडले जाऊ नयेत, यासाठी यंत्राच्या तोंडाशी दोन कर्मचारी बसलेले असतात. हे कर्मचारी चादरींची टोके पकडून त्या व्यवस्थित यंत्रात सारतात, तर यंत्राच्या दुसऱ्या टोकाला इस्त्री व घडी करून आलेल्या चादरींच्या छोटय़ा घडय़ा करण्यासाठी आणखी एक कर्मचारी बसलेला असतो. हा कर्मचारी पटापट घडय़ा करून यंत्रावरच त्या घडय़ा रचून ठेवतो. त्यापुढे या घडय़ांचे गठ्ठे बांधले जातात. वातानुकूलित टू टीअर किंवा प्रथमश्रेणी वातानुकूलित डब्यांमध्ये जाणाऱ्या चादरी आणि ब्लँकेट्स कागदी वेष्टनात गुंडाळले जातात.

परतीचा प्रवास..

कागदी वेष्टनांमध्ये गुंडाळलेल्या किंवा गठ्ठय़ांमध्ये बांधलेल्या चादरी याच लाँड्रीमधील एका मोकळ्या जागी आणून ठेवल्या जातात. हे गठ्ठे एका मोठय़ा प्लास्टिकच्या पिशवीत बांधून ते पुन्हा टेम्पोमध्ये चढवले जातात. तेथून या चादरी पुन्हा सीएसटी किंवा एलटीटी येथील लिनन रूममध्ये म्हणजेच चादरींसाठी असलेल्या खास दालनात आणल्या जातात. त्यानंतर स्थानकातील कर्मचारी वर्ग प्रत्येक गाडीच्या वातानुकूलित डब्यांमध्ये गरजेप्रमाणे या चादरी पोहोचवतो.

प्रवासादरम्यान वाट्टेल तशा वापरल्या जाणाऱ्या किंवा ‘आपल्याला थोडेच घरी घेऊन जायच्या आहेत’, या विचाराने प्रवासानंतर चोळामोळा करून आसनावर फेकल्या जाणाऱ्या चादरी स्वच्छ करण्यासाठी रेल्वेची ही यंत्रणा अक्षरश: अहोरात्र सुरू असते. एकच कमतरता म्हणजे या चादरींमध्ये जास्त खराब झालेल्या चादरींसाठी वेगळी यंत्रणा नाही. त्यामुळे या चादरी कितीही धुतल्या तरी कळकटच वाटतात. हा दोष रेल्वेच्या धुलाई यंत्रणेचा नसून आपल्या स्वच्छतेबाबतच्या अनास्थेचा आहे, हे लक्षात घ्यायला हवे!

लाँड्रीबद्दल थोडे काही..

वाडीबंदर यार्डमध्ये डॉकयार्ड रोड स्टेशनच्या जवळ ही टनेल लिनन लाँड्री आहे. सीएसटी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधील अंथरूण-पांघरूण धुण्याचे काम या लाँड्रीमध्ये होते. २०११ मध्ये सुरू झालेली ही लाँड्री १५ वर्षांच्या कराराने मध्य रेल्वेच्या सेवेत आहे. या लाँड्रीची क्षमता एका दिवसात १२ हजार चादरी एवढी आहे. या चादरी किंवा नॅपकिन आल्यापासून त्यांची इस्त्री व घडी होईपर्यंतची सगळी प्रक्रिया याच ठिकाणी होते. त्यासाठी स्विडिश कंपनीची यंत्रणा येथे बसवण्यात आली आहे.

प्रक्रिया कशी?

सीएसटी आणि एलटीटी येथे आलेल्या गाडय़ांमधून जमा केलेल्या चादरी टेम्पोद्वारे वाडीबंदर येथील या लाँड्रीत पाठवल्या जातात. येथे असलेला कर्मचारी वर्ग नॅपकिन, ब्लँकेट्स, चादरी आणि अभ्रे अशी विभागणी करून ते या धुण्याच्या यंत्राच्या चार वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये टाकतात. या यंत्राला प्रत्येक कपडा म्हणजे चादर, ब्लँकेट, अभ्रे वगैरे धुण्यासाठी संगणकाद्वारे विशिष्ट कमांड दिली जाते. त्यानुसार तो प्रोग्राम सेट केला जातो. प्रत्येक कप्प्यामध्ये ५० किलो एवढय़ा वजनाचे कापड मावते.

या चादरी धुतल्या जाण्यासाठी या यंत्रामध्ये १२ कप्पे आहेत. प्रत्येक कप्प्यामध्ये ५० किलोच्या या चादरी अडीच मिनिटांसाठी असतात. त्या कप्प्यात धुतल्या गेल्यानंतर या चादरी पुढील कप्प्यात सरकतात. तेथे पुन्हा अडीच मिनिटे या चादरी धुतल्या जातात. तोपर्यंत पहिल्या कप्प्यात ५० किलो वजनाच्या आणखी चादरी पडलेल्या असतात. अशा १२ कप्प्यांमधून या चादरी सरकल्यानंतर शेवटी त्या ड्रायरमध्ये टाकल्या जातात. येथे चादरींसाठी दोन ते पाच मिनिटे, ब्लँकेटसाठी २२ मिनिटे, नॅपकिनसाठी २० मिनिटे आणि उश्यांच्या अभ्य्रासाठी नऊ मिनिटे अशी वेळ नियोजित केली असते. त्यानुसार हा ड्रायर फिरतो. त्यानंतर या ड्रायरखाली ठेवलेल्या एका मोठय़ा ट्रेमध्ये या चादरी वाळवून पडतात. काहीशा ओल्या किंवा दमट असलेल्या या चादरी त्यापुढे इस्त्रीसाठी पुढील यंत्रावर जातात.

tohan.tillu@expressindia.com

@rohantillu