गंभीर दखल घेत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक
पश्चिम रेल्वेवरील वांद्रे टर्मिनससह इतर चार स्थानके आणि काही लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारी पाच पत्रे गेल्या पंधरा दिवसांत मिळाली आहेत. यातील वांद्रे टर्मिनस येथील पत्र बुधवारी आले असून त्यात फिरोजपूर जनता एक्स्प्रेस, कटरा-हापा आणि अहमदाबाद-दरभंगा या गाडय़ांमध्ये बॉम्बस्फोट करण्यात येईल, असे लिहिले आहे. पॅरिस हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर रेल्वे प्रशासन आणि स्थानिक सुरक्षा यंत्रणा यांनी ही धमकीपत्रे अत्यंत गंभीरपणे घेतली असून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीतील गुजरातमधील तीन स्थानकांवर सुरुवातीला ही पत्रे आली. सर्वात पहिले ३० ऑक्टोबर रोजी नवसारी स्थानकाच्या स्टेशन अधीक्षकांना मिळाले. या पत्रात गुजरात एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस आणि ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेस या गाडय़ांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणू, असे लिहिले होते. या पत्रानंतर तातडीने श्वानपथकाला पाचारण करून या सर्व गाडय़ांची सखोल तपासणी केली जात आहे.
या पत्रानंतर नऊ दिवसांनी, ७ नोव्हेंबर रोजी बाडरेली येथे स्टेशन अधीक्षकांना अशाच प्रकारचे पत्र मिळाले. या पत्रात बाडरेली रेल्वे स्थानक आणि बस स्थानक उडवण्याची धमकी देण्यात आली होती. तीनच दिवसांत, १० नोव्हेंबर रोजी राजकोट येथील रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयात एक धमकीपत्र आले.
या पत्रात कविगुरू एक्स्प्रेस उडवून देण्याची धमकी होती. ही गाडी राजकोट येथे तासभर थांबवून ठेवून कसून तपासणी केल्यावर पुढे रवाना करण्यात आली. तसेच मंगळवारी पुन्हा एकदा नवसारी स्थानकात एक धमकीपत्र आले.
या पत्रात ओखा-वांद्रे टर्मिनस, पश्चिम एक्स्प्रेस, बिकानेर-वांद्रे टर्मिनस या गाडय़ा उडवण्याची धमकी दिली असून या पत्राखाली ‘आतंकवाद जिहाद सिमी’ अशी सही आहे. हे पत्र १२ नोव्हेंबर रोजी पोस्टात टाकले असून ३९००१७ या पिन कोड क्रमांकावरून ते पत्र आल्याची माहिती मिळत आहे.
बुधवारी दुपारी १२.२० वाजता वांद्रे टर्मिनसच्या स्टेशन अधीक्षकांच्या कार्यालयात आणखी एक धमकीपत्र प्राप्त झाले असून त्यात फिरोजपूर जनता एक्स्प्रेस, कटरा-हापा आणि अहमदाबाद-दरभंगा या गाडय़ांमध्ये बॉम्बस्फोट करण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली आहे. ही पत्रे मिळाल्यानंतर तातडीने स्थानिक सुरक्षा यंत्रणांना पाचारण करण्यात आले आहे. तसेच स्थानकांवरील सुरक्षेतही वाढ करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत् चंद्रायन यांनी स्पष्ट केले.