प्रवासी आणि त्यांच्या सुरक्षेलाच आमचे प्राधान्य आहे, असे रेल्वेमंत्री आपल्या प्रत्येक भाषणांत सांगत असले, तरी रेल्वे अधिकाऱ्यांसाठी मात्र प्रवासीच महत्त्वाचे नाहीत! ही बाब खुद्द मध्य रेल्वेच्या उपमहाव्यवस्थापकांनी थेट ट्विटरवर मांडली. मंगळवारी मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील उपनगरी गाडय़ा दिरंगाईने धावत असल्याबद्दल प्रवाशांनी ट्विट्स केली. तसेच प्रवासी-ग्राहक पंधरवडय़ाऐवजी वक्तशीरपणा सुधारा, असा सल्लाही अनेकांनी ट्विटरवर दिला. त्याला उत्तर देताना ‘भारतीय रेल्वे काही फक्त प्रवाशांसाठी धावत नाही. इतरही घटकांना सेवा द्यावी लागते’, असे ट्विट या अधिकाऱ्याने केले.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी प्रवासी सुरक्षा, सुविधा आणि वक्तशीरपणा यांत सुधारणा करण्यासाठी २६ मे ते ९ जून यादरम्यान रेल्वे प्रवासी-ग्राहक सुविधा पंधरवडा घोषित केला. त्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील उपनगरीय गाडय़ांची वाहतूक तब्बल २० ते २५ मिनिटे उशिराने सुरू होती. त्यामुळे सकाळच्या वेळेत प्रवाशांचे चांगलेच हालही झाले.
प्रवाशांपैकी काहींनी आपल्या उद्रेकाला थेट ट्विटरवर वाचा फोडली. प्रवासी-ग्राहक सुविधा पंधरवडा आयोजित करण्यापेक्षा रेल्वेने वक्तशीरपणा वाढविण्याकडे लक्ष द्यायला हवे, असा सूर प्रवाशांनी लावला होता. त्यापैकी एका ट्विटला उत्तर देताना मध्य रेल्वेचे उपमहाव्यवस्थापक आर. अनंत यांनी, ‘भारतीय रेल्वे फक्त प्रवाशांसाठी सेवा चालवत नाही. त्यांच्यापेक्षा मोठय़ा घटकांना सेवा द्यावी लागते’, असे ट्विट केले. मात्र त्यानंतर त्यांनी आणखी एक ट्विट करत ‘प्रवाशांसाठीच देशभर हा पंधरवडा भारतीय रेल्वेने आयोजित केला आहे’, असे सांगत बाजू सावरली.
33