मध्य रेल्वेवर देखभाल आणि दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात येऊन गाडय़ांचे वेळापत्रक कसोशीने पाळले जावे याकडे विशेष लक्ष देण्यात यावे, अशी सूचना रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला केली आहे. तसेच रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याचे आदेशही त्यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाला दिले.      
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शनिवारी मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक, विविध विभागांचे अधिकारी यांच्याबरोबर बैठक घेतली आणि त्यांच्याबरोबर रेल्वे आणि प्रवाशांशी संबंधित विविध प्रश्नांवर चर्चा केली. या बैठकीत प्रभू यांनी उपरोक्त सूचना केली. मध्य रेल्वेने लागू केलेल्या नव्या वेळापत्रकामुळे सध्या प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आणि संताप व्यक्त करण्यात येत आहे. नव्या वेळापत्रकामुळे गाडय़ा उशिरा धावत असल्याने त्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत आहे. याची दखल प्रभू यांनी घेऊन उपनगरी गाडय़ांचे वेळापत्रक कसोशीने पाळून गाडय़ा वेळेत कशा धावतील, त्याची खबरदारी घेण्यास सांगितले. गाडय़ांच्या वेगावर मर्यादा येत असतील, ती कारणे दूर करावीत, मध्य रेल्वेवरील कल्याण यार्डाच्या पुनर्रचनेचे तसेच छत्रपती शिवाजी टर्मिनस ते ठाणे या दरम्यान विजेच्या ‘डीसी टू एसी’ परिवर्तनाचे सुरू असलेले काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.  
कल्याण रेल्वे यार्डाच्या पुनर्रचनेचे काम मध्य रेल्वेकडून हाती घेण्यात आले आहे. गेल्या काही दिवसात यार्डात स्विचेस, रूळ दुभाजक, रेल्वेमार्ग, स्लीपर्स बदलणे आदी कामे पूर्ण झाली आहेत. कल्याण रेल्वेस्थानकाजवळ दोन फलाटांचे रेल्वे रुळही बदलण्यात आले आहेत. या यार्डाच्या पुनर्रचनेच्या कामामुळे तसेच ठाकुर्ली आणि दिवा येथे असलेल्या रेल्वे फाटकामुळे गाडय़ांचे वेळापत्रक बिघडत असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मध्य रेल्वेकडून ठाणे ते कल्याण या विभागात शनिवारी आणि रविवारी मेगाब्लॉक घेऊन ही कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. मध्य रेल्वेकडून कल्याण यार्डातील कामांसाठी रेल्वेचे सुमारे ३०० कर्मचारी, २०० कंत्राटी कामगार तैनात करण्यात आले असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.