औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीत काहीसा मागे असलेला मराठवाडा रेल्वेच्या नकाशावरही पुसटसाच आहे. मात्र हे चित्र बदलण्याच्या दृष्टीने यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात चांगली तरतूद केली आहे. मराठवाडय़ातील बीड आणि परळी या दोन प्रमुख स्थानकांना मध्य रेल्वेमार्गावरील अहमदनगरशी जोडण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तब्बल २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी १०० कोटी रुपयांच्या कामांची निविदा प्रक्रिया आज, गुरुवारपासून सुरू होणार आहे. अहमदनगर ते बीड या टप्प्यातील महत्त्वाची कामे आगामी आर्थिक वर्षांत पूर्ण होणार आहेत.
मराठवाडय़ाच्या विकासासाठी या भागात रेल्वे पोहोचवण्याचा प्रयत्न आतापर्यंत अनेक नेत्यांनी केला. त्यापैकी गोपीनाथ मुंडे यांनी बीड आणि परळी या दोन स्थानकांना मध्य रेल्वेच्या अहमदनगर स्थानकांशी जोडण्यासाठी अहमदनगर-बीड-परळी या मार्गाचा पाठपुरावा केला होता.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या अर्थसंकल्पात या मार्गासाठी २०० कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. यापैकी १०० कोटी रुपयांच्या कामाची निविदा प्रक्रिया गुरुवारपासून सुरू होत आहे. कंत्राटदारांनी १ ते ८ एप्रिलपर्यंत निविदा भरायच्या आहेत. त्यानंतर त्या निविदांची तपासणी होऊन योग्य कंत्राटदारांना कंत्राट दिले जाईल. त्यानंतर वर्षभरात हे काम पूर्ण होणार आहे.
ही कामे होणार
* काडा ते आष्टी या टप्प्यात रेल्वेरूळ उभारण्यासाठी मातीचा बंधारा तयार करणे
* पुलांसाठी जागा तयार करणे
* रायमोहा ते बीड या ७.५ किमीच्या मार्गावर रेल्वेरूळांची उभारणी
* आष्टी ते अंमळनेर या ५.९ किमीच्या अंतरासाठी २७.७८ कोटींची तरतूद
* मोठय़ा आणि छोटय़ा पुलांच्या कामासाठी २१.११ कोटी रुपयांचे कंत्राट