रेल्वेच्या महामेगाब्लॉकमुळे झालेल्या गर्दी-गोंधळाने गाडीतून पडून झालेल्या तीन प्रवाशांच्या मृत्यूबाबत रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनय मित्तल यांनी शनिवारी मुंबईत हात झटकले. मात्र मध्य रेल्वेवर ठाणे व कळवा यार्डाच्या तांत्रिक कामाबाबतच्या कामाची पूर्वकल्पना प्रवाशांना देण्यात आम्ही कमी पडलो, अशी स्पष्ट कबुली त्यांनी दिली. यापुढे रेल्वेच्या विभागात समन्वयाचा अभाव राहू नये, यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या काळात उपनगरी गाडय़ांना झालेल्या प्रचंड गर्दीमुळे तीन प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू असली तरी या अपघातांचा रेल्वेच्या कामाशी काही संबंध असल्याचे दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले. दोन मृत्यू हे डाऊन मार्गावर झाले होते, मग गर्दीचा त्याच्याशी काय संबंध, असा सवालही त्यांनी केला.
प्रवाशांना खूशखबर
*     मुंबईत लवकरच प्रायोगिक तत्त्वावर वातानुकूलित उपनगरी गाडी
*     येत्या मे महिन्यापर्यंत दहा ठिकाणी सरकते जिने
*     रेल्वे प्रवाशांसाठी ५१ अतिरिक्त सेवा मार्चपर्यत देणार
*     पश्चिम रेल्वेवर आणखी एक १५ डब्यांची गाडी
*     छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कल्याण मार्ग जूनपर्यंत डीसीमध्ये रूपांतरित
*     खानपान तक्रारींच्या निवारणासाठी स्वतंत्र कक्ष