गर्दीने खचाखच भरलेल्या लोकलमधून बाहेर पडताच.आई शप्पथ..बॅग गाडीतच राहिली.सगळे पैसेपण गेले. मोबाइलपण गेला.. अशा एक ना अनेक घटनांची ओरड नेहमीच रेल्वे स्थानकांवर ऐकू येते. गेल्या वर्षभरात रेल्वे प्रवासात अशाच मौल्यवान वस्तू विसरलेल्या २ हजार २४० प्रवाशांना रेल्वे पोलिसांच्या मदतीने ९० लाख ९६ हजार ९१० रुपये किमतीचा ऐवज परत मिळाल्याची माहिती रेल्वे पोलीस अधिकाऱ्याने दिली.
गेल्या वर्षभरात रेल्वे गाडीत लॅपटॉप, कॅमेरा, सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि भ्रमणध्वनी विसरल्याच्या ११ हजार ७०७ प्रवाशांनी मदतीसाठी रेल्वे पोलिसांच्या हेल्पलाइनवर संपर्क साधला. यात वर्षभरात केवळ २ हजार २४० प्रवाशांनाच त्यांच्या वस्तू परत मिळू शकल्याने रेल्वे पोलिसांवर उपनगरीय रेल्वे संघटनांकडून टीका केली जात आहे. मात्र लोकल गाडीत विसरलेल्या वस्तू अनेक प्रवासी वस्तू परत मिळणार नाहीत या विचाराने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याची तसदी घेत नाहीत. केवळ हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून प्रवाशांना वस्तू परत मिळणार नाहीत. त्यांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.
प्रवाशांच्या रेल्वे गाडीत विसरलेल्या वस्तू पोलिसांना मिळताच, त्या न्यायालयात दाखल करून त्याची नोंद केली जाते. त्यानंतर प्रवाशांची चौकशी करून त्यांना त्या वस्तू सोपवल्या जातात, असे रेल्वे पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे प्रवाशांनी वस्तू विसरल्यास रेल्वे पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदवावी, असे सांगण्यात आले.
रेल्वे प्रवासात प्रवाशांना काही समस्या उद्भवल्यास त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी रेल्वे पोलिसांनी ९८३३३३११११ हा क्रमांक उपलब्ध करू दिला आहे. यात गेल्या वर्षभरात रेल्वे अपघात, अपमृत्यू, वैद्यकीय मदत आदींसाठी १०८१ तक्रारी हेल्पलाइनवर नोंदवण्यात आल्या. यात ६२० जखमी प्रवाशांना विविध रुग्णालयांत दाखल करण्यात पोलिसांनी मदत केली. त्याचप्रमाणे अपमृत्यूबाबत आलेल्या १४६ तर वैद्यकीय मदतीसाठी आलेल्या ३१५ जणांना मदत पुरविण्यात आल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

वर्षभरात ११ हजार जणांनी रेल्वे रूळ ओलांडले
पश्चिम रेल्वे मार्गावर होणाऱ्या तीन हजारांहून अधिक अपघातांमध्ये सुमारे ४५ टक्क्यांहून अधिक अपघात रूळ ओलांडताना होतात. ही बाब वारंवार आधोरेखित करून ‘रेल्वे रूळ ओलांडून जीव धोक्यात घालू नका’, असे आवाहन केले जाते. मात्र तरीही पश्चिम रेल्वे मार्गावर वर्षभरात अकरा हजार जणांनी रेल्वे रूळ ओलांडले असल्याचे समोर आले आहे. यात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्याकडून ४१ लाख ७१ हजार २७५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ‘रेल्वे रूळ ओलांडू नका,’ असे आवाहन करूनही त्यास न जुमानणाऱ्या प्रवाशांविरोधात पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाने कारवाईचा बडगा उगारला आहे. ‘भावेश नकाते’ प्रकरणानंतर रेल्वे अपघातांची संख्या कमी करण्यासाठी प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा दल यांनी एकत्रितपणे मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. यात रोज रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांविरोधात धडक कारवाई केली जात आहे. मात्र तरीही काही बेशिस्त प्रवासी या बाबींकडे दुर्लक्ष करत सर्रास रूळ ओलांडत असल्याने कारवाई आणखी कठोर करण्याचा निर्णय रेल्वे सुरक्षा दलाकडून घेण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

बॉम्ब अफवा
जानेवारी ते डिसेंबर २०१५ कालावधीत स्थानकांवर बॉम्ब ठेवल्याच्या अफवा पसरविणारे पाच दूरध्वनी आले. एक धमकीसाठी तर १२७ संशयित व्यक्ती/ बॅगांबाबत तक्रारी नोंदवण्यासाठी रेल्वे पोलिसांच्या हेल्पलाइनवर संपर्क साधण्यात आला.

हरविलेल्या व्यक्ती
रेल्वे हद्दीत हरविलेल्या व्यक्तींसाठी ३१४ जणांनी हेल्पलाइनवर संपर्क साधला. यात १४२ जणांचा शोध घेण्यात आला. तर अनेकांनी हरविलेली व्यक्ती भेटल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्याची तसदी घेतली नसल्याचे समोर आले आहे.