‘प्रवासी सुविधा आणि सुरक्षा हे रेल्वेचे प्रमुख ध्येय आहे,’ असे आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी स्पष्ट केल्यावर प्रवासी सुविधेच्या नावाखाली पैशांची उधळपट्टी करण्याचे काम सध्या रेल्वेमध्ये सुरू आहे.
    प्रवाशांना तातडीने तिकीट मिळावे आणि तिकीट छपाईची गरज भासू नये, यासाठी सुरू केलेल्या मोबाइल तिकीट प्रणाली सेवेसाठी आता रेल्वे तिकीट छपाई यंत्र तयार करत आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून पुढील तीन महिन्यांत मध्य व पश्चिम रेल्वेवर ५० छपाई यंत्रे प्रायोगिक तत्त्वावर येणार आहेत. मोबाइल तिकिटांच्या तपासणीसाठी एखादी उत्तम प्रणाली विकसित करण्याऐवजी रेल्वे छपाई यंत्रांवर भर देत असल्याने प्रवासी संघटनांमध्येही नाराजी आहे.
तिकीट खिडक्यांवरील लांबच लांब रांगांपासून प्रवाशांची सुटका करण्यासाठी रेल्वेने एटीव्हीएम, जेटीबीएस, सीव्हीएम अशा विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्याची पुढील पायरी म्हणून रेल्वेने डिसेंबर २०१४च्या अखेरीस मोबाइल तिकीट प्रणाली सुरू केली. या प्रणालीनुसार मोबाइलवरून तिकीट काढणे शक्य झाले आहे. मात्र ही तिकिटे छापणे रेल्वेने बंधनकारक केले असून सध्या त्यासाठी एटीव्हीएम यंत्रांची मदत घेतली जात आहे. परिणामी एटीव्हीएम यंत्रांपुढील रांगा वाढल्या आहेत.
यावर उपाय म्हणून मोबाइल तिकीट छपाई टाळण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्याऐवजी रेल्वेने या तिकिटांसाठी वेगळे छपाई यंत्र तयार करण्यावर भर दिला आहे. रेल्वे बोर्डाने तसा प्रस्ताव सादर केला असून निविदा प्रक्रियाही सुरू केली आहे. या निविदा प्रक्रियेत अर्ज दाखल झाले असून रेल्वे बोर्ड आता या अर्जाचा अभ्यास करून त्यातून कंपनीची निवड करेल. ही कंपनी येत्या तीन महिन्यांत प्रायोगिक तत्त्वावरील यंत्र तयार करणार आहे. सुरुवातीला अशी ७५ यंत्रे तयार करण्यात येणार असून त्यापैकी २५ मध्य व २५ पश्चिम रेल्वेवर पाठवण्यात येतील. या यंत्रांच्या चाचणीनंतर अधिक यंत्रे मुंबईत दाखल होणार असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
मात्र, मोबाइल तिकिटांची छपाई करण्याऐवजी मोबाइलवरून काढलेले तिकीट यांत्रिक पद्धतीने तपासण्यासाठी एखादे यंत्र तिकीट निरीक्षकांसाठी विकसित करणे गरजेचे होते. पण रेल्वे विनाकारण मोबाइल तिकीट छपाई यंत्र तयार करण्यासाठी पैशांची उधळपट्टी करत आहे, अशी टीका विविध प्रवासी संघटनांनी केली. मोबाइल तिकीट यंत्रणेला अल्प प्रतिसाद असण्यामागे ही तिकीट छपाई हे प्रमुख कारण आहे. त्याचे उच्चाटन करण्यासाठी वेगळी तिकीट तपास यंत्रणा विकसित करण्याची गरज उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या नंदकुमार देशमुख यांनी बोलून दाखवली.