उपनगरीय सेवेत मनोरंजनासाठी वेळच नाही

रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांच्या मनोरंजनासाठी एफएम रेडिओ वाहिन्यांची मदत घेतली जाईल, अशी घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्पात केली असली, तरी या घोषणेबाबत रेल्वे अधिकाऱ्यांमध्येच प्रचंड साशंकता आहे. उपनगरीय रेल्वेमध्ये एफएम वाहिन्यांद्वारे मनोरंजन पुरवण्यासाठी रेल्वेच्या उद्घोषणा बाजूला ठेवाव्या लागणार आहेत. ते शक्य नसल्याने ही सेवा केवळ लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी लागू होऊ शकते. मात्र त्यासाठी रेल्वेने ठोस नियमावली तयार करण्याची गरजही रेल्वेतील अधिकारी बोलून दाखवत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला एफएम रेडिओ वाहिन्या मात्र रेल्वेतील या नव्या शिरकावासाठी उत्सुक आहेत.

सुखद प्रवासाचा अनुभव देण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ‘वर्क स्टेशन’, वाय-फाय अशा विविध सुविधांसह आता एफएम रेडिओचीही घोषणा केली आहे. रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांच्या मनोरंजनाची सोय करण्यासाठी एफएम रेडिओ वाहिन्यांद्वारे रेल्वेच्या डब्यांत गाणी ऐकण्याची सोय करण्यात येईल, अशा प्रकारची घोषणा  प्रभू यांनी केली. मात्र या घोषणेबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना शंका आहेत.

उपनगरीय रेल्वे प्रवासात दोन स्थानकांमधील अंतर खूप कमी आहे. तसेच रेल्वेने नव्यानेच उपनगरीय गाडय़ांत पुढील स्थानकाची आणि प्रवाशांच्या सुरक्षेची उद्घोषणा प्रत्येक स्थानकानंतर आणि पुढील स्थानक येण्याआधी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दोन स्थानकांदरम्यान एफएमवरील गाणी प्रवासी नेमके कधी ऐकणार, असा प्रश्न पश्चिम रेल्वेतील एका अधिकाऱ्याने उपस्थित केला. लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये ही सेवा उपयोगी ठरू शकते. तसेच प्रवाशांचे मनोरंजनही होऊ शकते. या गाडय़ांमध्ये प्रवासी स्थिरस्थावर झालेले असतात. पण नेमक्या कोणत्या वाहिनीला हे कंत्राट द्यायचे, हे कसे ठरणार, असा प्रश्न मध्य रेल्वेतील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने विचारला आहे. रेल्वेने त्याबाबतची नियमावली जाहीर करणे अपेक्षित आहे. त्यानंतरच एफएम वाहिन्यांबाबत योग्य निर्णय होऊ शकतो, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.ह्ण

‘सेवेची संधी अभिमानास्पद’

एफएम वाहिन्यांच्या मते ही खूप मोठी संधी आहे. रेल्वे स्थानकांवर आणि गाडय़ांमध्येही एफएम सेवेद्वारे मनोरंजन सुविधा पुरवणे, ही गोष्ट एफएम कंपन्यांसाठी आणि रेडिओ उद्योगासाठी अभिमानास्पद आहे. एफएम रेडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही मोठी गोष्ट असल्याचे रेडिओ सिटी ९१.१ एफएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अब्राहम थॉमस यांनी सांगितले.