मध्य रेल्वेचे रडगाणे सुरुच असून शनिवारी सकाळी वांगणी- शेलू दरम्यान रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. बदलापूर ते कर्जत दरम्यानची वाहतूक सुमारे अर्धा तास ठप्प होती. त्यामुळे भाऊबीजेच्या दिवशी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांचा खोळंबा झाला.

मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाडाचे सत्र सुरुच आहे. शनिवारी सकाळी वांगणी- शेलूदरम्यान रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे कल्याण – कर्जत मार्गावर बदलापूरपर्यंतच वाहतूक सुरु होती. यामुळे भाऊबीजेच्या दिवशी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांचे हाल झाले. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्याही काही काळ खोळंबल्या होत्या. अर्धा तासाने रुळाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आणि वाहतूक पूर्ववत झाली. मात्र यामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. कल्याण- कर्जत मार्गावरील गाड्या सुमारे १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. यामुळे बदलापूर, अंबरनाथ या स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली आहे.

ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड, रेल्वे रुळाला तडे, पॉईंट फेल होणे अशा विविध कारणांमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळत होण्याचे प्रमाण वाढले आहे. २०१६-१७ मध्ये लोकल गाड्यांच्या वक्तशीरपणामध्ये सुधारणा झालेली नाही. विविध कारणांमुळे तब्बल २२ हजार ४१० लोकल फेऱ्यांचा वक्तशीरपणा बिघडल्याची माहिती सप्टेंबरमध्ये समोर आली होती. यात सर्वाधिक रेल्वे फाटक व सिग्नलमधील बिघाडामुळे १९ हजार ३११ फेऱ्या उशिराने धावल्या.