मध्य व पश्चिम मार्गावर येत्या डिसेंबपर्यंत व्यवस्था

रेल्वे स्थानक परिसरात घडणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्याबरोबरच महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने सीसीटीव्हींचे जाळे अधिक विणण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या डिसेंबपर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांच्या परिसरात २५०९ सीसीटीव्ही बसवण्याची योजना आहे.

गुन्ह्यांचा मागोवा घेण्यात सीसीटीव्ही महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे आपल्या विभागातील सीसीटीव्हींची संख्या वाढवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार निर्भया निधीअंतर्गत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वे स्थानकांमध्ये २,५०९ सीसीटीव्ही डिसेंबपर्यंत बसवण्यात येतील, अशी माहिती रेल्वे सुरक्षा विभागाकडून देण्यात आली.

छेडछाड, विनयभंग इत्यादी कारणांमुळे रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे रेल्वेकडून अनेक सुरक्षाविषयक उपाय करताना लोकलच्या महिला डब्यात सीसीटीव्ही आणि स्थानकातील सुरक्षा व्यवस्थेतही वाढ करण्यात येत आहे; तर रेल्वे हद्दीत एखादा गुन्हा घडल्यास सीसी टीव्हीव्दारे त्या गुन्ह्य़ाचा यशस्वीरीत्या तपास करण्यास मदत होते. परंतु सीसीटीव्हींची अपुरी संख्या, त्यांचा निकृष्ट दर्जा यामुळे मुंबई विभागातील सीसीटीव्हींचा विषय नेहमीच चर्चेत येतो. म्हणून सर्वसामान्य प्रवाशांबरोबरच महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हींची संख्या वाढविण्यावर रेल्वेने भर दिला आहे. त्यानुसार मध्य रेल्वेच्या सीएसटी ते इगतपुरी, लोणावळा आणि पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते डहाणू, वापीपर्यंत या मुंबई विभागात असणाऱ्या स्थानकांत सीसीटीव्हींची संख्या वाढवण्यात येईल.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात सध्या २,९०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही आहेत. निर्भया निधी वापरून मध्य रेल्वेवर आणखी २,१३९ सीसीटीव्ही बसवण्यात येतील. यासाठी जवळपास ७४ स्थानकांची निवड करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेवरही निर्भया निधीमार्फत ३७० सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. या मार्गावरील २० पेक्षा जास्त स्थानकांवर हे सीसीटीव्ही बसतील.

निर्भया निधी वापरून येत्या डिसेंबपर्यंत नवीन सीसीटीव्हीचे काम पूर्ण होईल. हे सीसीटीव्ही चांगल्या दर्जाचे असतील. सध्या या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

– सचिन भालोदे, मध्य रेल्वे-वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त

सीसीटीव्ही कोठे?

* मध्य रेल्वेवरील भायखळा, कुर्ला, घाटकोपर ते ठाणे तसेच दिवा, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण आणि त्यापुढील स्थानकांत.

* पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट, मरिन लाइन्स, मुंबई सेन्ट्रल, वांद्रे, अंधेरी, बोरिवली आणि विरार ते डहाणू दरम्यानच्या स्थानकांत.