अरबी समुद्रातील स्थिती पावसासाठी पोषक नसली तरी यावेळी महाराष्ट्राच्या मदतीला बंगालचा उपसागर धावून आला आहे. एकीकडे उत्तरेत मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झालेला असतानाच मध्य महाराष्ट्रासह कोकणात दुसऱ्या दिवशीही मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. शुक्रवारीही कोकणातील काही भागांमध्ये मुसळधार सरींचा अंदाज आहे. त्यानंतर पावसाचा जोर कमी होईल. कोकणात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

अरबी समुद्रावरून येणाऱ्या मान्सूनच्या वाऱ्यांमुळे विदर्भ वगळता राज्याच्या बहुतांश भागात पाऊस पडतो. मात्र यावेळी अरबी समुद्रावरून येणारे वारे प्रभावहीन असल्याने राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. बंगालच्या उपसागरातील स्थिती मात्र मान्सूनसाठी योग्य असून त्यामुळे गेले काही दिवस मध्य व दक्षिण भारतात चांगला पाऊस सुरू आहे. गुरुवारी कोकण तसेच मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ातील काही भागात मुसळधार सरी पडल्या. शुक्रवारीही कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर पावसाचा जोर ओसरणार आहे. मात्र पुन्हा सोमवारी कोकण तसेच मध्य महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता केंद्रीय वेधशाळेने वर्तवली आहे.
महाराष्ट्रात पावसामुळे काहीसा दिलासा मिळत असला तरी उत्तरेत मात्र मान्सूनच्या माघारीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. सध्या केवळ राजस्थानच्या काही भागातून मान्सूनने माघार घेतली असली तरी या राज्यासह जम्मू-काश्मिर, पंजाब, हरयाणा, चंढीगढ, उत्तराखंड, हिमाचय प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या पश्चिम भागात पाऊस थांबला असून पुढील पाच दिवसही पावसाची शक्यता नाही. त्यामुळे पुढील आठवडय़ाभरात या भागातून मान्सूनने माघार घेतल्याची अधिकृत घोषणा होऊ शकेल. दरम्यान बंगालच्या उपसागरातील घडामोडींमुळे मान्सून दक्षिण भारतात रेंगाळला असून सप्टेंबरच्या अखेरच्या आठवडय़ातही दक्षिण भारतात पावसाच्या सरी येतील, असा अंदाज आहे.