उन्हाच्या काहीलीतून सुटका करणा-या पावसाचे आगमन आज सकाळी मुंबईत झाले. पावसामुळे सुखद गारव्याचा लोकांना दिलासा मिळाला असतानाच दुसरीकडे मुंबईतील लोकल यंत्रणा मात्र मंदावली आहे. पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक तांत्रिक बिघाडामुळे मंदावली आहे.
मध्य रेल्वेवरील मुंलुंड स्थानकात ओव्हरहेड वायरमध्ये स्पार्किंग झाल्याने सीएसटीच्या दिशेने जाणा-या जलद आणि धिम्या मार्गांवर वाहतूक मंदावली आहे. मध्य रेल्वेवरील लोकल २० मिनिटे उशिराने धावत आहेत.  तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मरिन लाईन्स दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे चर्चगेटच्या दिशेने जाणारी धीम्या मार्गावरील वाहतूक उशीराने होत आहे. तर दुसरीकडे हार्बर रेल्वे मार्गावरही सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे नाहतूक उशीराने होत आहे.
दरम्यान, मुंबईसह उपनगरांत पावसाचे आगमन, ठाणे, मुलुंडमध्ये पावसाची जोरदार हजेरी लावली आहे. अंधेरी, दादर, वरळी, लोअर परळ भागातही पावसाच्या सरी बरसल्या.