हवामान खात्याने शुक्रवारी मान्सून मुंबईत दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली. तसेच येत्या २४ तासांत मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळेल, अशी शक्यताही यावेळी हवामान खात्याने व्यक्त केली. दरम्यान, गुरूवारी रात्रीपासूनच मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाच्या तुरळक सरी पडण्यास प्रारंभ झाला होता. त्यानंतर रात्रीच्या सत्रात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, शुक्रवारी सकाळपासूनच मुंबईत रिमझिम पावसाला सुरूवात झाली होती. गेल्या २४ तासांमध्ये मुंबईमध्ये २५.४८ मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या मुंबईच्या तुलनेत पश्चिम उपनगरांमध्ये पावसाचे प्रमाण जास्त असलेले पहायला मिळत आहे. पश्चिम उपनगरात पावसाचा जोर अधिक आहे. येथे सरासरी ३४ मिलिमीटर एवढा पाऊस झाला, तर मुंबईच्या पूर्व उपनगरात ११ मिलिमीटर पाऊस झाला. दरम्यान, पहिल्या पावसामुळे अंधेरीसह काही ठिकाणी रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत होताना दिसत आहे. मुंबईच्या अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. अंधेरी, वांद्रे, वरळी, दादर येथे पावसाच्या सरी पडल्या. तसेच, बोरिवली, मीरा, भाईंदर येथे चांगला पाऊस झाला.
तत्पूर्वी गुरूवारी रात्री मुंबईच्या विविध भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे बोरिवली (पश्चिम) भागात रेल्वेस्थानक परिसरात काही प्रमाणात पाणीही साचले होते. नरिमन पाँईंट, अंधेरी, गोरेगाव येथेही तुरळक पाऊस पडला. मात्र, त्याची नोंद झाली नसल्याचे महापालिका आपात्कालिन नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले होते.