गेला आठवडाभर राज्यभरात आनंदाच्या धो धो सरी घेऊन येणाऱ्या पावसाचा जोर कोकण वगळता इतरत्र आज, शनिवारपासून ओसरणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसाच्या मध्यम सरी अपेक्षित असून विदर्भ व मराठवाडय़ात पावसाच्या केवळ तुरळक सरी येतील, असा अंदाज अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

राज्यात दुबार पेरण्यांची वेळ येऊन ठेपली असतानाच पावसाने धडाक्यात पुनरागमन केले. गेल्या आठवडय़ात अरबी समुद्रावरून आलेल्या मोसमी वाऱ्यांनी कोकण व पश्चिम महाराष्ट्रात मजल मारली. त्यांना १८ जुलैपासून बंगालच्या उपसागरावरून आलेल्या मोसमी वाऱ्यांची सोबत मिळाली आणि विदर्भ व मराठवाडय़ातील काही ठिकाणी पावसाने शेतकऱ्यांना हात दिला व धरणातील पाणीसाठाही वाढवला. आता मात्र मोसमी वारे विश्रांती घेण्याच्या बेतात आहेत. अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे कोकणातील बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.

सोलापूर व उस्मानाबाद येथे पावसाचे आतापर्यंतचे प्रमाण अत्यंत कमी आहे. सोलापूरमध्ये सरासरीच्या केवळ २१ टक्के तर उस्मानाबाद येथे ७७ टक्के पाऊस पडला. अकोला, जालना येथेही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला असून िहगोली, परभणी, औरंगाबाद येथेही पावसाचे प्रमाण समाधानकारक नाही. पश्चिम महाराष्ट्रात नंदुरबार येथे सरासरीपेक्षा ११ टक्के कमी पाऊस झाला.

पर्जन्यभान

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात पुढील किमान पाच दिवस पावसाचा प्रभाव राहील. या वाऱ्यांमुळे पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी येतील. मात्र मराठवाडा व विदर्भ येथे मात्र पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहील. मोसमी वारे हे टप्प्याटप्प्यात प्रवेश करत असल्याने पावसाने काही दिवस ओढ देणे हे सामान्य आहे.

भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग

’भातसा धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून येत्या चार ते पाच दिवसांत धरणाचे दरवाजे उघडावे लागणार आहेत. त्यामुळे भातसा धरणातून अधिक प्रमाणात विसर्ग केला जाण्याची शक्यता असल्याने जवळपासच्या नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन भातसा धरण व्यवस्थापन विभागाने केले आहे.

’भातसा नदीच्या तीरावरील विशेषत: शहापूर, किन्हवली रस्त्यांवरील सापगाव पूल, सापगाव व नदीकाठावरील इतर गावांतील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांनी गावातील नागरिकांना नदीच्या पाण्याच्या पातळीत केव्हाही वाढ होऊ शकते, अशा सूचना द्याव्यात. तसेच या काळात वाहत्या पाण्यात कोणी प्रवेश करणार नाही, याचीही दक्षता घ्यावी, असे या आवाहनात म्हटले आहे.