हवेतील प्रदूषित कण पावसाने ‘धुवून’ निघाले, पावसाचा असाही फायदा
अवकाळी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हालात भर पडलेली असतानाच मुंबईकरांना मात्र या आकस्मिक पावसाचा फायदा झाला आहे. दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी तेथील मुख्यमंत्र्यांना सायकल रॅली काढावी लागत असली तरी समुद्राच्या जवळ असल्याचा मुंबईकरांना आयताच फायदा मिळत आहे. दिवाळीचे फटाके संपल्याने कमी झालेले प्रदूषक घटकांचे उरले सुरले कणही रविवारच्या पावसाच्या सरींमध्ये धुवून निघाले आहेत. पावसासोबत आलेल्या वेगवान वाऱ्यांनीही शहरातील हवा स्वच्छ केली असून चेंबूर वगळता संपूर्ण शहरातील सर्व प्रदूषक घटकांचे प्रमाण मर्यादित पातळीपेक्षाही कितीतरी कमी नोंदले गेले.
मान्सूनच्या चार महिन्यात वाट पाहायला लावलेल्या पावसाने रविवारी अचानक मुंबईकरांना गाठले. उपनगरात काही ठिकाणी जोरदार सरी आल्या. मुंबईसह मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ातही अवकाळी पावसाने तारांबळ उडवून दिली. मात्र या अवकाळी पावसाचा मुंबईतील रहिवाशांच्या आरोग्यासाठी फायदा झाला आहे. बोरीवली, मालाड, अंधेरी, वांद्रे कुर्ला संकुल, भांडूप, चेंबूर, माझगाव, वरळी, कुलाबा अशा नऊ उपनगरात कार्यरत असलेल्या प्रदूषण मापक यंत्रणेवरून ओझोन, नायट्रोजन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड तसेच सूक्ष्म धुलिकणांचे प्रमाण समजते. यातील बहुतांश प्रदूषक घटक हे वाहनांमधून बाहेर पडणारा धूर तसेच बांधकामांमुळे हवेत मिसळणाऱ्या धुलिकणांमुळे होतात. पावसासोबत हे घटक वाहून जात असल्याने जून ते सप्टेंबरदरम्यान शहराची हवा शुद्ध होती. मात्र ऑक्टोबरनंतर हवेची प्रतवारी घसरली आणि दिवाळीच्या आधीच शहराची हवा श्वास घेण्यासाठी त्रासदायक ठरली. दिवाळीतील फटाक्यांमुळे दमा, श्वसनविकाराच्या रुग्णांच्या हालात भरच पडली. दिवाळीचे फटाके संपल्यानंतर हवा पुन्हा एकदा समाधानकारक पातळीवर आली होती. त्यातच रविवारच्या पावसाने आणि जोरदार वाऱ्यांनी सोबत दिली आणि मुंबईची हवा सोमवारी आल्हाददायक झाली.
सर्व प्रदूषक घटकांचे सर्व उपनगरातील प्रमाण हे मर्यादित पातळीपेक्षा कितीतरी खाली होते. मुसळधार पाऊस पडून गेल्यावर साफ, स्वच्छ दिसणारी हवा मुंबईकरांना सोमवारी अनुभवता आली. अर्थात हा अवकाळी पाऊस मंगळवारनंतर थांबणार असल्याने ही केवळ दोन दिवसांची आल्हाददायक हवा आहे. वाहनांची वाढती संख्या, गर्दी आणि बांधकाम यासोबतच थंडीतील तुलनेने कमी वेगवान वारे यामुळे मुंबईकरांची श्वसनविकारांमधून सुटका नाही.

241115_LS_MVT_001

नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण अधिकच
चेंबूरमध्ये नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक आहे. शहरातील इतर भागात हे प्रमाण शंभर मायक्रोग्रॅम प्रति घनफूटपेक्षा कमी असले तरी त्याची पातळी जास्त आहे. वाहनांच्या इंजिनमधून बाहेर पडणाऱ्या धूरामुळे नायट्रोजन ऑक्साइडचे प्रमाण वाढते. हा वायू शरीरात गेल्यास फुप्फुसांना इजा पोहोचवतो. श्वसनविकार तसेच कर्करोगासाठीही हा वायू कारणीभूत ठरू शकतो.

241115_LS_MVT_001-copy-2

241115_LS_MVT_001-copy