सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील किनारपट्टी भागातील स्थानिक लोकांनी जमिनी विकल्या व आजही विकत आहेत. मला विचारून अथवा सांगून हे व्यवहार होत नाहीत. या जमिनी दमदाटी करून विकायला लावल्याची एकही तक्रार पोलिसांमध्ये नाही, त्यामुळे राज यांनी खेडमधील सभेत केलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सांगितले.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना भाषण करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. मात्र राजकीय आरोप करण्यापूर्वी त्यात काही सत्यता आहे का, याची किमान पडताळणी त्यांनी करणे आवश्यक होते. ज्या अहवालाच्या आधारे त्यांनी आरोप केले त्यात कोणतीही ठोस माहिती नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात दमदाटी करून जमिनी विकायला लावल्या जातात याची कोणतीही तक्रार येथील पोलीस ठाण्यात नाही. एवढेच नव्हे तर राज्यात गुन्ह्य़ांचे सर्वात कमी प्रमाण सिंधुदुर्गमध्ये असल्याचे नारायण राणे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.  राज यांनी मला आधी विचारले असते तर त्यांना अहवालाचा खरेखोटेपणा दाखवून दिला असता. मी कोणाची एक इंच जरी जमीन बळकावल्याचे पुराव्यानीशी दाखवून दिले तर एक दिवससुद्धा सार्वजनिक जीवनात राहणार नाही, असे आव्हानही राणे यांनी दिले आहे.