पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱयांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरूवारी सडकून टीका केली. पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत सर्वात जास्त काळ देशाबाहेर राहणारे नरेंद्र मोदी हे आतापर्यंतचे पहिले पंतप्रधान असल्याचे राज म्हणाले. तसेच राज यांनी आपल्या नेहमीच्या उपरोधिक शैलीत मोदींवर टीका करताना सलमान खान बजरंगी भाईजानचा सिक्वल चित्रीत करत असल्याचे मला समजले असून या सिक्वलमध्ये सलमान मोदींना भारतात परत आणताना दिसेल, असा टोला लगावला. ‘इंडिया टूडे’ने आयोजित केलेल्या परिषदेत राज बोलत होते.
हे कसलं सरकार आपल्याला मिळालयं? हे सरकार कामं करण्याऐवजी प्रत्येक गोष्टीवर बंदी आणत सुटलं आहे. देशातील समस्या सोडविण्याला प्राधान्य देण्याची गरज असताना पंतप्रधान परदेश दौऱयांत बासरी आणि ढोल पिटण्यात मग्न होते. आता बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते देशात आले आहेत. पंतप्रधान झाल्यापासून मोदींनी २८ परदेश दौरे केले यातून देशातील किती समस्या सुटल्या? असा सवाल राज यांनी यावेळी उपस्थित केला.

बुलेट ट्रेनच्या मुद्द्यावरूनही राज यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. ‘सबका साथ, सबका विकास’च्या घोषणा करणाऱयांना देशातील पहिल्या बुलेट ट्रेनसाठी अहमदाबाद शहरच का दिसले? मुंबईहून बुलेट ट्रेनने माणसं अहमदाबादला ढोकळा खायला जाणार का? असा टोला राज यांनी लगावला.

पती-पत्नी देखील इतक्या आवेशाने कधी भांडत नाहीत तितक्या आवेशात सेना-भाजपमध्ये सध्या कलह सुरू आहे. दोन्ही पक्षांना राज्याची काहीच पडलेली नाही. केवळ मतांचे राजकारण हाच यांचा उद्देश असल्याचे राज यांनी सांगितले. गुलाम अलींच्या कार्यक्रमाला शिवसेनेने केलेल्या विरोधाला पाठिंबा देत राज म्हणाले की, एक गायक म्हणून आमचा गुलाम अलींना विरोध नाही पण आपल्या कलाकारांना पाकिस्तानात अपेक्षित आदर, मानसन्मान मिळतो का? आपल्या देशात अनेक प्रतिभावंत कलाकार आहेत दुसऱया देशातील कलाकारांनी येऊन येथे बस्तान बसवण्याची आम्हाला गरज नाही, असेही ते पुढे म्हणाले.