महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचे फटकारे आता फेसबुकवर पाहता येणार आहेत. २१ सप्टेंबरपासून राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचे फटकारे फेसबुकवर पाहता येतील. राज ठाकरेंच्या फेसबुकवरील एन्ट्रीचा टिझर मनसेकडून तयार करण्यात आला आहे. हा टिझर मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन लॉन्च करण्यात आला आहे.

राज ठाकरे त्यांच्या राजकीय व्यंगचित्रांसाठी ओळखले जातात. राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारी राज ठाकरे यांची हीच व्यंगचित्रे आता फेसबुकवर पाहता येणार आहेत. ‘व्यंगचित्रांचे ठाकरी फटकारे अन् दांभिकतेवर गरजणारी ‘राज’गर्जना आता फेसबुकवर’ असे शीर्षक टीझरला देण्यात आले आहे. त्यामुळे आता राज यांच्या ‘ठाकरी’ फटकाऱ्यांचा ‘फटका’ कोणाकोणाला बसणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

उद्यापासून राज ठाकरे फेसबुकच्या माध्यमातून थेट तरुणांशी जोडले जाणार आहेत. त्यांच्या व्यंगचित्रांबद्दल तरुणांच्या मनात मोठी उत्सुकता असून मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन लॉन्च करण्यात आलेला टीझर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होतो आहे.