स्वत:चा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी भाजपकडून ‘नीट’ परीक्षेचे राजकारण करण्यात येत आहे. स्वत:च्या वैयक्तिक स्वार्थासाठी भाजप विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी केला. ‘नीट’विरोधी पालक आणि विद्यार्थ्यांनी शनिवारी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन आपले गाऱ्हाणे मांडले. यावेळी राज यांनी भाजप सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआडून स्वत:चे राजकारण साधत असल्याचा आरोप केला. न्यायालयाने ‘नीट’ची परीक्षा घेण्याचे आदेश दिले असले तरी सध्या बाजारात ‘नीट’च्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके उपलब्ध नाहीत. याशिवाय, विद्यार्थी गेल्या दोन वर्षांपासून सीईटीची तयारी करत होते. आता न्यायालयाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवर अवघड परिस्थिती ओढावली आहे. मात्र, भाजपमधील नेत्यांची वैद्यकीय महाविद्यालये नसल्याने त्यांना या सगळ्याशी काही घेणेदेण नाही. राज्यातील बहुतांश वैद्यकीय महाविद्यालये काँग्रेस नेत्यांची आहेत. त्यामुळे ‘नीट’च्या माध्यमातून भाजप काँग्रेसबरोबरचे राजकीय हिशेब चुकते करण्याचा प्रयत्न करत आहे, असे राज यांनी म्हटले.
राज्यांचे महत्त्व कमी करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. केंद्राला जे निर्णय घ्यायचे असतात , ते सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून सुनावले जातात. या सरकारला डान्सबारची काळजी आहे, विद्यार्थ्यांची आहे. उद्या विद्यार्थ्यांनी काही बरं-वाईट केलं तर त्याची जबाबदारी कोण घेणार?, असा संतप्त सवालही त्यांनी केला. व्यापारी, विद्यार्थी, पालक सगळेच सरकारच्या विरोधात जाऊ लागलेत. त्यामुळे सरकार राहतं की नाही हे यांना तीन वर्षांत कळेलच, असा सूचक इशाराही राज यांनी दिला.