विकास आराखडा तयार करण्यासाठी मुंबईकरांचे पैसे वाया गेले आहेत. त्यामुळे अशा निरर्थक विकास आराखड्यासाठी कोट्यावधींची उधळण करणाऱया अधिकाऱयांवर कडक कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱयांवर कडाडून टीका केली. शेवटी विकास आराखडा तयार करण्यावर मुंबईकरांच्या खिशातले पैसे उधळले गेले आहेत. मुंबईकरांना ग्राह्य धरून यांनी विकास आराखडा तयार करायचा आणि त्यासाठी मुंबईकरांचेच पैसे उधळायचे अशा अधिकाऱयांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी राज ठाकरे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
अखेर मुंबईचा प्रस्तावित विकास आराखडा रद्द
मुंबईचा प्रस्तावित वादग्रस्त विकास आराखडा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाबद्दल राज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार यावेळी व्यक्त केले. ते म्हणाले की, “मुंबईच्या विकास आराखड्याचे चित्र भीषण होते. त्यातील चुका लक्षात घेता खरंतर याआधीच या आराखड्याला केराची टोपली दाखवणे अपेक्षित होते. परंतु, उशीरा का हाईना रद्द केला त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन. मुंबईकरांनी या विकास आराखड्याविरोधात रेटा लावल्यामुळेच हे शक्य झाले आहे. मुंबईकरांच्या सजगतेमुळे खरंतर हा विकास आराखडा रद्द झाला.”
विकास आराखडा लोकांसाठी हवा, लोकं विकास आराखड्यासाठी नाही याची जाणीव ठेवून आराखड्याची बांधणी करण्यात यावी. तसेच विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांना बोलवावे आणि त्यांच्यासमोर विकास आराखडा ठेवावा. यासोबतच मुंबईत मराठी माणूस टीकला पाहिजे या दृष्टीकोनाचा देखील नवीन विकास आराखड्यात विचार व्हायला हवा, असेही राज यावेळी म्हणाले.
मेट्रो-३ प्रकल्पावरून राज्य सरकारवर शरसंधान साधत आरे कॉलनीत मेट्रोचे कारशेड होऊच देणार नाही अशी ठाम भूमिका राज यांनी यावेळी मांडली. तसेच मराठी चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी तडजोड वृत्ती ठेवण्यापेक्षा मल्टीप्लेक्समध्ये एक स्क्रिन मराठी चित्रपटांसाठी द्यायलाच हवी, असे राज्य सरकारने ठणकावून सांगायला हवे. असेही राज म्हणाले.

‘कारशेड नकोच’
कोणत्याही परिस्थितीत आरे कॉलनीमध्ये मेट्रोच्या कारशेडसाठी जागा घेऊ देणार नाही, असेही त्यांनी ठणकावले. आरे कॉलनीतील मेट्रोच्या संकल्पित जागेजवळ तीनदा आगी लावण्यात आल्या त्याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. मुंबईत अनधिकृत झोपडय़ा फोफावत असताना जे साहाय्यक पालिका आयुक्त त्यांना ‘थंड’ बसून ‘साहाय्य’ करतात त्यांनाही शिक्षा करा अशी मागणी त्यांनी केली. विकास आराखडय़ाला मनसेने हरकत घेतली नसती तर यांनी तो मंजूरही करून टाकला असता असा टोलाही त्यांनी लगावला.