पालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज ठाकरे आज भूमिका मांडणार
आंदोलनांची दिशा कशी असावी, कोणत्या प्रकारची आंदोलने घ्यावी तसेच आगामी काळात आंदोलनांचे स्वरूप काय असेल यासह पक्षबांधणीपासून पक्षाच्या अंगीकृत संघटनांमधील समन्वयाच्या अभाव आणि ‘मराठी बाण्या’वर पनवेल येथील आयुष रिसॉर्टमध्ये मनसेच्या निवडक पदाधिकाऱ्यांच्या शिबिरात गुरुवारी नेत्यांनी मार्गदर्शन केले. मुंबईसह राज्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकीची तयारी आणि पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांचे वाटप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुंबईसह राज्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकीत कोणत्या पदाधिकाऱ्यांनी कोणती जबाबदारी पार पाडायची, आंदोलने कशी व कोणती घ्यायची तसेच पक्षबांधणी भक्कम करताना मुंबई महापालिकेत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी मनसेच्या निवडक पदाधिकाऱ्यांचे शिबीर आयोजित केले होते. सकाळी नीटच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे शिबिरासाठी पनवेल येथे पोहोचले. मनसेचे नेते शिशिर शिंदे, नितीन सरदेसाई तसेच अविनाश अभ्यंकर यांची भाषणे या वेळी झाली. शिशिर शिंदे यांनी आंदोलनांची दिशा कशी असली पाहिजे याबाबत आपली भूमिका मांडली तर पक्ष आणि अंगीकृत संघटनांचा समन्वय असण्यावर सरदेसाई यांनी या वेळी भर दिला. अभ्यंकर यांनी पक्षबांधणीचे महत्त्व विषद केले. मात्र महापालिका निवडणुकीवर थेट बोलण्याचे या तिघाही नेत्यांनी टाळले. तसेच विधानसभा व लोकसभेतील पराभवाची चिकित्साही या वेळी कोणी केली नाही. या शिबिराला मनसेचे नेते, तसेच निवडक पदाधिकारी उपस्थित होते. उद्या या शिबिराचा समारोप राज ठाकरे यांच्या भाषणाने होणार असून महापालिका निवडणुकीच्या रणनीतीवर राज ठाकरे भाष्य करतील, असे सूत्रांनी सांगितले. मुंबई, ठाणे, पुणे व नाशिकसह दहा महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. पक्षातील गळती तसेच नगरसेवकांचे पक्षसोडणे, सेना-भाजप वेगळे लढण्याची शक्यता तसेच मनसेची आजची ताकद लक्षात घेता राज नेमकी काय भूमिका मांडणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.
मुंबईतील पालिकेच्या एकेका प्रभागाची जबाबदारी उपाध्यक्षांवर सोपविण्यात येणार असून सरचिटणीसांकडे विभागनिहाय जबाबदारी सोपविली जाणार असल्याचे समजते.