मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने वर्षा बंगल्यावर दिग्दर्शक करण जोहर आणि निर्माता असोसिएनशी झालेल्या चर्चेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी राज यांनी पाक कलाकार असलेल्या चित्रपटाच्या निर्मात्यांना प्रायश्चित म्हणून भारतीय सैन्याच्या कल्याणकारी निधीसाठी (आर्मी वेल्फेअर फंड) प्रत्येकी पाच कोटी रूपये देण्यास सांगितले. ही सूट केवळ चित्रीकरण अंतिम टप्प्यात असलेल्या चित्रपटांसाठी असेल, असे राज यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून मनसेकडून ‘ऐ दिल है मुश्किल’च्या प्रदर्शनाला करण्यात येत असलेल्या विरोधामुळे वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर बोलताना राज ठाकरे यांनी सांगितले की, मला दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता. त्यावेळी त्यांनी याविषयी काही तोडगा काढता येईल, का अशी विचारणा केली होती. मी त्याला स्पष्ट नकार दिला होता. मात्र, आज मुख्यमंत्र्यांच्या आग्रहाखातर मी करण जोहर आणि निर्मात्यांसोबतच्या बैठकीला हजर राहण्यास तयार झालो, असे राज यांनी सांगितले. उरी किंवा पठाणकोट हल्ल्यासारखे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. आम्ही वारंवार सांगूनही भारतीय निर्मात्यांकडून पाकिस्तानी कलाकारांसदर्भात कोणतीही कठोर भूमिका घेण्यात आली नव्हती. मात्र, या आंदोलनाच्या निमित्ताने निर्मात्यांनी पाकिस्तानी कलाकारांवर घातलेली बंदी हे आमच्या आंदोलनाचे यश असल्याचे राज यांनी सांगितले. या बैठकीत मी चित्रपट प्रदर्शित करून देण्यासाठी निर्मात्यांच्या संघटनेसमोर काही अटी ठेवल्या. चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी भारतीय जवानांना आदरांजली देणारी पाटी दाखविण्यात यावी. तसेच यापुढे पाकिस्तानी कलाकार, तंत्रज्ञ आणि गायकांना चित्रपटात घेणार नाही, असे पत्रच निर्मात्यांच्या संघटनेने द्यावे. याशिवाय, ज्या चित्रपटांमध्ये पाकिस्तानी कलाकार आहेत आणि त्यांचे चित्रीकरण अंतिम टप्प्यात आले आहे, अशा चित्रपटांच्या निर्मात्यांनी प्रायश्चित म्हणून भारतीय सैन्यासाठीच्या कल्याणकारी निधीला पाच कोटी रूपयांची देणगी द्यावी, अशा अटींचा यामध्ये समावेश असल्याचे राज यांनी सांगितले. तसेच पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन वाहिन्यांवर बंदी घालण्यात येत असेल तर तुम्ही पाकिस्तानी कलाकारांसाठी रेड कार्पेट का अंथरता, असा सवालही राज यांनी निर्मात्यांच्या संघटनेला विचारला. दरम्यान, ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये पाकिस्तानी कलाकार असल्यामुळे हा चित्रपट पाहायला कुणी जाईल असे मला वाटत नाही, अशी टिप्पणीही राज ठाकरे यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी ‘ऐ दिल है मुश्किल’च्या वादावर तोडगा काढण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि दिग्दर्शक करण जोहर यांना समोरासमोर बसवून चर्चा केली. ही चर्चा फळाला आली असून काही अटींच्या मोबदल्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाला असणारा विरोध मागे घेण्याची तयारी दाखविली आहे.