मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंसोबत ‘नीट’च्या मुद्द्यावर लढा देणारे काही पालकही उपस्थित होते. या भेटीवेळी दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील विविध प्रश्नांसोबत आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चाही झाल्याचे समजते. काही वृत्तवाहिन्यांनी यासंबंधीच्या बातम्या दिल्या आहेत. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
वैद्यकीय प्रवेशासाठीच्या प्रवेश परीक्षेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात काही पालक लढा देत आहेत. ‘नीट’मधून राज्य सरकारांना काहीसा दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने अधिसूचनाही प्रसिद्ध केली. मात्र, त्यानंतरही राज्यातील विद्यार्थ्यांपुढील समस्या मुख्यमंत्र्यांना सांगण्यासाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली काही पालकांनी गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी पालकांनी आपले मुद्दे मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. त्यानंतर राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये सुमारे २० मिनिटे विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे समजते. यामध्ये आगामी महापालिका निवडणुकांचाही समावेश होता, असे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. मात्र, दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याची अधिकृत माहिती मिळालेली नाही.