मेट्रो रेल्वेसाठी जागा घेणे हे निमित्त असून आरे कॉलनीतील जमिनी बळकावण्याचा डाव असल्याची टीका करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. मेट्रोच्या बाबतीत आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत या प्रकल्पाला विरोध कायम राहील असे स्पष्ट करत मेट्रोच्या कारडेपोसाठी पोर्ट ट्रस्टच्या जागेचा वापर का नाही करत? असा सवाल राज यांनी सरकारला केला.
मेट्रोचा कारडेपो, विकास आराखडय़ाच्या निमित्ताने आरे कॉलनीतील जागेबाबत वाद सुरू झाल्याच्या पाश्र्वभूमीवर राज ठाकरे यांनी सोमवारी सकाळी आरे कॉलनीत जाऊन कारडेपोच्या जागेची पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी आरेच्या प्रश्नावर मनसेची आक्रमक भूमिका कायम राहणार असल्याचे संकेत दिले. आरे डेअरी बंद करून जागा बळकावण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा इशारा आपण पाच-सहा वर्षांपूर्वीच दिला होता. आता ते सारे खरे ठरत आहे. राजकारणी, बिल्डर, उद्योजक या साऱ्यांचाच आरेच्या जागेवर डोळा असल्याचा आरोप करत मेट्रो प्रकल्प हे केवळ निमित्त असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘जायका’ या जपानी वित्तसंस्थेकडे मेट्रोसाठी कर्ज मागताना सादर केलेल्या प्रकल्प अहवालात आरे कॉलनीच्या परिसरात वन्यजीवन नसल्याची खोटी माहिती देण्यात आल्याकडे लक्ष वेधत राज्य सरकारचा समाचार घेतला. मेट्रोसाठी कारडेपो सुरू करण्यासाठी केवळ ‘आरे’चीच जागा कशासाठी? मुंबई पोर्ट ट्रस्टची जागा रिकामी होत आहे. त्याचा विचार का नाही केला? असा सवालही राज ठाकरे यांनी केला. तसेच कारडेपो ‘आरे’तून हलवावा, अशी मागणीही त्यांनी केली.

याचसाठी सत्तेवर आलात का?
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचीच धोरणे पुढे चालू ठेवायची होती तर सत्ता का मागितली? याचसाठी सत्तेवर आलात का? असा सवालही राज ठाकरे यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारला केला.