रेल्वे प्रशासनाविरोधात धडक मोर्चा काढणाऱ्या मनसेविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक वाहतुकीला अडथळा आणणे आणि जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मनसेचे चर्चगेट येथील विभाग अध्यक्ष अरविंद गावडे यांच्याविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता.

एल्फिन्स्टन रोड स्टेशनवरील पुलावर गेल्या शुक्रवारी चेंगराचेंगरी होऊन २३ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मनसेने रेल्वे प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. रेल्वे प्रवाशांना न मिळणाऱ्या सोयीसुविधांविरोधात गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. हा संताप मोर्चा असल्याचे मनसेने म्हटले होते. मोर्चाला परवानगी मिळावी यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आझाद मैदान पोलिसांना पत्र पाठवले होते.

गुरुवारी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे हजारो कार्यकर्ते चर्चगेटमधील रेल्वेच्या मुख्यालयावर धडकले. मेट्रो जंक्शन ते चर्चगेटमधील रेल्वे मुख्यालय असा या मोर्चाचा मार्ग होता. रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. मनसेच्या या मोर्चामुळे वाहतूक कोंडीही झाली होती. या पार्श्वभूमीवर गुरुवारी संध्याकाळी आझाद मैदान पोलीस ठाण्यात आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मनसेचे विभाग अध्यक्ष अरविंद गावडे हे या मोर्चाचे आयोजक असल्याने पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. राज ठाकरेंविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मोर्चानंतर राज ठाकरे यांनी रेल्वे प्रशासन आणि मोदी सरकारवर टीका केली. रेल्वेने मुंबईतील सर्व स्टेशनवरील पादचारी पुलांवरील फेरीवाले १५ दिवसात हटवावे, त्यांना रेल्वेने हटवले नाही तर मग मनसे त्यांना हटवणार आणि यातून जो संघर्ष होईल त्याची जबाबदारी रेल्वेची असेल असा इशाराच त्यांनी दिला.