दहीहंडी हा पक्षाचा नव्हे, तर सणाचा विषय असल्याचे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दहीहंडीच्या निर्णयावरून राज्य सरकारवर निशाणा साधला. दहीहंडीच्या पूर्वसंध्येला सण सणासारखा साजरा झाला पाहिजे, या शब्दांत राज य़ांनी सरकारच्या निर्णयावर टीकास्त्र सोडले. गोविंदा पथकांशी कोणतीही चर्चा न करता राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा पळपुटे धोरण असल्याचे बुधवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी सांगितले. दहीहंडी थराने नाही तर आता मिसाइलने फोडायची का? असा उपहासात्मक टोलाही यावेळी राज यांनी लगावला. हा उत्सव साजरा करताना धागडधिंगा होता कामा नये, असेही राज ठाकरेंनी नमूद केले. दहीहंडी फोडताना अपघात होण्याची जास्त शक्यता असते. यावर सलामी देऊन हंडी खाली उतरवून फोडण्याचा मार्ग निघू शकतो. त्यामुळे थर लावू नयेत हा निर्णय योग्य मानता येणार नसल्याचे त्यांनी म्हटले. राज्य सरकारने दहीहंडीवर निर्बंध लावताना मंडळांशी चर्चा केलेली नाही. मुंबईतील सर्वच मंडळे मोठे थर लावत नसून, ठराविक मंडळे सरावानंतर हा धाडसी खेळ करत असतात. त्यामुळे गटवारी करुन सरकारने मंडळांना सूचना देणे अपेक्षित होते. मात्र सरकारने गोविंदा पथकांशी चर्चा न करता तसेच गोविंदा पथकांची दहीहंडी बाबतची योजना समजून घण्यासाठी बैठक घेतली नसल्याचे राज ठाकरे म्हणाले.