फलकावर पत्नी व मुलाचे छायाचित्र लावण्यास राज यांचा विरोध
माझी पत्नी शर्मिला व मुलगा अमित यांची छायाचित्रे यापुढे होर्डिग्डवर लावाल तर खबरदार. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कुटुंबीयांचा नाही, असा सज्जड दम मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पनवेल येथे आयोजित निवडक पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये शुक्रवारी दिला. तसेच पक्षबांधणी भक्कम करण्याचे आदेशही त्यांनी या वेळी दिले.
मनसेचे नेते, सरचिटणीस, उपाध्यक्ष अशा निवडक पासष्ट पदाधिकाऱ्यांचे दोन दिवसांचे शिबीर पनवेल येथे आयोजित करण्यात आले होते. निवडणुका येतात व जातात परंतु पक्षबांधणी महत्त्वाची असल्याचे सांगून आगामी महापालिका निवडणुकीनिमित्त कशा प्रकारे तयारी करायची याचे मार्गदर्शन राज यांनी शिबिराच्या समारोपप्रसंगी केले.
माझी पत्नी अथवा मुलगा एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहणार असेल व त्यासाठी त्यांचे छायाचित्र होर्डिग्जवर लावले तर एक वेळ समजू शकते परंतु मनसेच्या शाखांवर अथवा अन्य कार्यक्रमानिमित्त त्यांची छायाचित्रे बॅनर अथवा होर्डिग्जवर लावता कामा नये, असेही राज यांनी स्पष्टपणे सांगितले. हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे कुटुंबीयांचा नाही, अशीही समज त्यांनी या वेळी दिली. तसेच काही महिला पदाधिकारी‘ ‘वैनीसाहेबांशी’ बोलणं झालंय’ असे सांगत फिरतात तेही बंद करा.
या पक्षाचा प्रमुख मी आहे तेव्हा काय ते माझ्याशी बोला असे सांगून यापुढे ‘वैनीसाहेब, वैनीसाहेब’ खपवून घेणार नाही, असेही राज यांनी सांगितले. येत्या ३० जून रोजी महापालिका निवडणुकीनिमित्त पुन्हा सर्व पदाधिकाऱ्यांचा मेळावा पनवेल येथे आयोजित करण्यात येणार असून त्यावेळी नेमकी दिशा स्पष्ट केली जाईल, असेही ते म्हणाले. मुंबईतील विधानसभा मतदारसंघनिहाय पक्षबांधणीची जबाबदारी या वेळी उपाध्यक्षांकडे सोपविण्यात आली.
या उपाध्यक्षांनी शाखानिहाय गटाध्यक्ष तसेच इमारत प्रतिनिधींची नियुक्ती योग्य प्रकारे झाली आहे अथवा नाही ते तपासून वीस दिवसांत आपल्याला अहवाल द्यावा, असे आदेश राज यांनी दिले. तसेच सोशल मीडियाचे महत्त्व अधोरेखित करून त्याचा प्रभावी वापर करण्यासही त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना सांगितले.