ईश्वर तायडे आणि सुरेश आवळे यांनी अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करीत शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे संतप्त झालेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांना खडसावले.

मनसेमधील काही नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त गेल्या काही दिवसांपासून पालिकेमध्ये चर्चिले जात होते. मात्र मनसेचे नगरसेवक ईश्वर तायडे आणि सुरेश आवळे यांनी शिवसेनेत प्रवेश करीत भाजपला एक धक्का दिला होता. मनसेचे नगरसेवक पक्ष सोडून जाऊ लागल्याच्या पाश्र्वभूमीवर राज ठाकरे यांनी बुधवारी ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी नगरसेवकांची बैठक आयोजित केली होती.

आगामी पालिका निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर मनसेतून मोठय़ा प्रमाणावर नगरसेवक आणि कार्यकर्ते अन्य पक्षांमध्ये जाण्याची क्यता असल्यामुळे ही बैठक आयोजित करण्यात आल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती. पैशांसाठी दुसऱ्या पक्षात जाणार असाल तर ते क्षणिक आहे. तुमच्या काही समस्या असतील तर मला सांगा. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू, असे राज ठाकरे यांनी यावेळी नगरसेवकांना सांगितले.

दरम्यान, मुंबईमधील मनसेच्या नगरसेवकांची ‘कृष्णकुंज’ येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राज ठाकरे यांनी नगरसेवकांना दम दिल्याच्या वावडय़ा उठविण्यात आल्या.

असा कुठलाही प्रकार या बैठकीत झाला नाही, असे मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.