मुंबईत दहीहंडीचा उत्सव साजरा करताना गोविंदा पथकांनी न्यायालयाने दिलेल्या २० फुटावर दहीहंडी फोडण्याच्या आदेशाचे उल्लंघन केले नसल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. गोविंदा पथकाने  नऊ थर रचले असले तरी,  नऊ थर रचून हंडी फो़डली नसल्यामुळे त्यांच्यावर केस कशी दाखल करणार, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. मुंबईतील गोविंदा पथकांची भेट घेतल्यानंतर रविवारी राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी त्यांनी  दलितांच्या अत्याचार थांबविण्यासाठी ५६ इंचाच्या छातीवर गोळी झेलण्याची तयारी दाखविणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील पुन्हा निशाणा साधला. दलितांवरील अत्याचार थांबविण्याचे मोदींचे हैदराबादमधील वक्तव्य उत्तर प्रदेशच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर असल्याचे राज यांनी म्हटले.  पंतप्रधान यांचे वक्तव्य हे आपल्यासाठी  भावनात्मक आव्हान वाटते आणि आम्ही केलेले वक्तव्य प्रसारमाध्यमांना राजकारण का वाटते. असा सवालही त्यांनी केला.  राज्याच्या मुख्यमंत्री गुजरातीमध्ये ट्विट करतात, असा टोमणा मारत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली.  यावेळी त्यांनी वस्तू व सेवा कर विधेयक मान्य असले तरी त्यामध्ये केंद्राच्या हस्तक्षेपाला विरोध असल्याचेही स्पष्ट केले. लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झालेले वस्तू व सेवाकर विधेयक अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. या विधेयकाला मनसे विरोध करणार असल्याचे संकेतही यावेळी राज ठाकरे  यांनी दिले. विधेयकाला पाठिंबा असला तरी, या विधेयकानुसार वसूल केला जाणारा कर हा केंद्राने का वसूल करावा, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.  वस्तू कर सेवा विधेयकातील कर वसूल प्रणालीचा मार्ग चुकीचा असून प्रत्येक गोष्टीला केंद्राकडे जावे लागेल  असे सांगत त्यांनी अधिवेशनात सर्व राजकीय पक्षानी या प्रणालीतील त्रूटीचा विरोध करावा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. पर्युषण काळात मांसविक्रीवर बंदी घातली जाते, मग श्रावणात का बंदी घातली जात नाही असा सवाल उपस्थित करत मतांसाठीच हे राजकारण सुरु असते अशी टीकाही त्यांनी केली.