रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि हिंदू संस्कार समितीचे जनक राजाराम ऊर्फ राजाभाऊ ताम्हनकर यांचे बुधवार १३ फेब्रुवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे.
राजाभाऊ ताम्हनकर यांचा जन्म कोकणातील कुवेशी येथे झाला. त्यांच्या जीवनावर संघाचा पगडा होता. अर्थार्जनापेक्षा लोकार्जनाला त्यांनी नेहमीच महत्त्व दिले. हिंदू संस्कार पुढील पिढीत संक्रमित व्हावेत यासाठी एक लक्ष सूर्यनमस्कार संकल्प, एक लक्ष अथर्वशीर्ष संकल्प, सामूहिक मौजीबंधन सोहळे, वधुवर सूचक मंडळ असे अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले.
विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघ आणि उत्कर्ष मंडळ या दोन्ही संस्थांच्या वतीने त्यांना अमूल्य योगदानासाठी पुरस्कृत करण्यात आले होते. त्याचप्रमाणे उत्तुंग परिवाराच्या वतीने त्यांना सेवाव्रती आणि पार्लेभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवावर अंधेरी येथील पारशीवाडा स्मशानभूमीत अन्त्यसंस्कार करण्यात आले.