राजधानी एक्सप्रेसमधून महिला प्रवाशांच्या बॅगेतील पैसे आणि इतर साहित्य चोरीला गेल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या ट्रेनमधील तिकिटतपासणीस सुद्धा मद्यधुंद अवस्थेत आढळून आला आहे.
  दिल्लीहून बुधवारी सुटललेल्या राजधानी एक्सप्रेस मध्ये गोवंडीत राहणाऱ्या महिला वैमानिक सत्याराज मोहन (४५) आणि एक वास्तुविशारद नीता बोरकर (५१) चढल्या होत्या. त्या दोघी सेकंड एसी मधून प्रवास करीत होत्या. सुरत येथे सत्याराज यांना त्यांच्या बॅगेतील ५९ हजार रुपयांची रोकड, विमानतळावर प्रवेश करण्यासाठी असलेले ऑरेंज कार्ड आणि एक ब्रेसलेट गायब झालेले आढळले. नीता बोरकर यांच्याही बॅगेतील ३८ हजार रुपयांची रोकड गायब झालेली होती. त्यानंतर या दोघी तक्रार देण्यासाठी तिकीट तपासनीसाला शोधायला गेल्या. तिकीट तपासनीस सुर्यकुमार परिहार पॅण्ट्रीमध्ये मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. मुंबईत आल्यावर सत्याराज आणि बोरकर यांनी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांकडे चोरीची आणि तिकीटतपासनीसाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिकीटतपासनीसाची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्याने मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याविरोधात रेल्वे कडे तक्रार केल्याचे मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी सांगितले.