मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चेची तयारी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या सरकारमधून आणि रालोआ (एनडीए) तून  ‘स्वाभिमानी’ पक्ष बाहेर पडत असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जाहीर केले. मात्र पूर्वाश्रमीचे स्वाभिमानी सदाभाऊ खोत यांचे शेट्टी यांच्याशी बिनसल्याने त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नाही. शेट्टी यांचे सहकारी व राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तूपकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे राजीनामा दिला असून त्यावर योग्य वेळी निर्णय घेणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वीच रालोआमधून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले होते.

* शेट्टी यांनी कर्जमाफीसह अन्य मुद्दय़ांवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याविरोधात गेल्या काही महिन्यांमध्ये हल्लाबोल केला होता.

* भाजपशी त्यांचे संबंध बिघडले होते. फडणवीस यांनी त्यांच्याच संघटनेत फोडाफोडी केल्याने शेट्टी यांना फटका बसला आहे. त्यामुळे            शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रालोआतून बाहेर पडत असल्याचे शेट्टी यांनी फडणवीस यांची सोमवारी भेट घेऊन जाहीर केले. शेतकऱ्यांच्या
सर्व  प्रश्नांवर चर्चेची तयारी असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.