खासदार राजू शेट्टी यांचा इशारा

समृद्धी महामार्गावरून मुख्यमंत्री दिशाभूल करीत असून पोलिसांच्या दडपशाहीने मोजणी केली जात आहे. मात्र यापुढे कोणत्याही अधिकाऱ्याने शेतात पाय ठेवला तर त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. प्रसंगी रक्त सांडू, पण कोणत्याही परिस्थितीत समृद्धी महामार्ग होऊ देणार नाही, असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिले आहे. या प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांनी घेतलेल्या आक्षेपांचे आणि कर्जमाफीची मागणी करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांचे पोतंभर अर्ज उद्या राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना देण्यात येणार आहेत.

कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २२ मे रोजी पुण्यातून सुरू झालेली स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आत्मक्लेश यात्रा मुंबईत पोहोचली असून उद्या तिचा समारोप होणार आहे. समृद्धी महामार्गास ८० टक्के शेतकऱ्यांचा पाठिंबा असून जमिनीची मोजणीही झाल्याचा दावा कालच मुख्यमंत्र्यांनी केला होता. त्याबाबत बोलताना खा. शेट्टी म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचा हा दावा फसवा असून ते लोकांची फसगत करीत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना आता या लढय़ात उतरली असून एकही शेतकऱ्याने स्वेच्छेने जमीन दिलेली नाही. प्रलोभने आणि पोलिसी दडपशाहीच्या माध्यमातून बळजबरीने शेतकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा करण्याचे उद्योग सुरू आहेत, मात्र आता हे सहन केले जाणार नाही. उद्या राज्यपालांना भेटणार असून त्या वेळी समृद्धी महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांनी घेतलेल्या आक्षेपांची कागदपत्रे सुपूर्द केली जाणार आहेत. संघटनेला सरकारच्या उत्तराची अपेक्षा नसून सदाभाऊ खोत नसले तरी काही फरक पडत नाही, असेही त्यांनी सांगितले.

८० टक्के शेतकऱ्यांचा विरोध

समृद्धी महामार्गावरून मुख्यमंत्री गफलत करीत असून ८० टक्के शेतकऱ्यांचा समृद्धी महामार्गास विरोध आहे. तशा प्राथमिक अधिसूचनेस व थेट वाटाघाटीस हरकती असून जमिनी देण्यास विरोध असल्याचे ८० टक्के शेतकऱ्यांनी भूसंपादन अधिकाऱ्यांना लेखी दिले आहे.  शेतकऱ्यांनी कधीही जमीन मोजणीस संमती दिलेली नाही, मोजणीच्या विवरणपत्रावर कुठल्याही शेतकऱ्यांच्या सह्य़ा नाहीत, मग संयुक्त मोजणी झालीच कधी, असा सवाल समृद्धी महामार्ग विरोधी शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक बबन हरणे यांनी केला आहे.