उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस; दहाव्या उमेदवाराबाबत उत्सुकता

राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस असून, काँग्रेस-राष्ट्रवादीत एकमत झाल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ९ उमेदवार जाहीर झाले असून दहाव्या उमेदवाराबाबत उत्सुकता आहे.

विधान परिषदेकरिता पाच जागा भाजप, दोन जागा शिवसेना अशा युतीच्या सात जागा तर आघाडीच्या तीन जागा, या संख्याबळानुसार निवडणूक बिनविरोध करण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. काँग्रेसमध्ये दोन जागा लढवाव्यात, असा मतप्रवाह होता. काँग्रेस व राष्ट्रवादीने प्रत्येकी दोन उमेदवार रिंगणात उतरविले असते तर प्रत्यक्ष मतदान झाले असते. राष्ट्रवादी दोन तर काँग्रेस एक अशा तीन जागा लढविण्यात येत असल्याने आघाडीच्या तीन उमेदवारांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला. आतापर्यंत राज्यसभेसाठी तीन तर विधान परिषदेकरिता दोन उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती सहनिवडणूक अधिकारी भाई मयेकर यांनी दिली.

राज्यसभेसाठी काँग्रेसचे पी. चिदम्बरम, विधान परिषदेकरिता नारायण राणे तर राष्ट्रवादीने रामराजे नाईक-निंबाळकर आणि धनंजय मुंडे हे संयुक्तपणे अर्ज दाखल करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. पक्षाचे बाहेरून लादण्यात आलेले उमेदवार पी. चिदम्बरम यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेतली.  राज्यसभेकरिता विजयासाठी ४१ मतांची आवश्यकता आहे. शिवसेनेकडे २० मते तर छोटे पक्ष आणि अपक्षाची २० अशी ४० मते असली तरी राज्यसभेकरिता मतांच्या फाटाफुटीची शक्यता कमी आहे.

निवृत्त अधिकाऱ्याचे प्रयत्न

विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे असतानाच, एक निवृत्त सनदी अधिकारी अपक्ष निवडणूक लढवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी अपक्षांच्या स्वाक्षऱ्या ते घेत होते. काही अपक्षांनी अर्जावर सह्य़ा केल्याची चर्चा होती.

उमेदवारीत भाजपचे धक्कातंत्र

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले शहरातील ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांना भाजपतर्फे राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारीत भाजपने धक्कातंत्र वापरल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील प्रख्यात नेत्रतज्ज्ञ म्हणून डॉ. महात्मे यांची ओळख असून त्यांनी राज्यातील विविध भागात नेत्रशिबिरे आयोजित करून हजारो लोकांना दृष्टी दिली आहे. मुंबई व नागपूर येथे त्यांची रुग्णालये आहेत. नेत्रतज्ज्ञ म्हणून समाजातील त्यांचे योगदान बघता यूपीए सरकारच्या काळात काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांनी डॉ. महात्मे यांची पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस केली होती आणि त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले.