जैन मुनी, संत हल्ले तसेच रस्ते अपघातात झालेले त्यांचे मृत्यू आणि जैन मंदिरांमधील मूर्तीची तोडफोड करण्याच्या घटनांच्या निषेधार्थ मुंबईतील जैन समाजातर्फे मोर्चा काढण्यात आला. मेट्रो सिनेमापासून आझाद मैदानापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चाचे नंतर सभेत रूपांतर झाले. जैन महासंघाच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात श्वेतांबर, दिगंबर, तेरापंथी तसेच स्थानिक जैन अशा चारही प्रकारच्या जैन समाजाचे लोक मोठय़ा प्रमाणवार सहभागी झाले होते.
 गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान या राज्यांमध्ये जैन मुनी, मंदिरे यांच्यावरील हल्ल्याच्या घटना घडल्या असून जैन साधू, साध्वी यांनाही मारहाण करण्यात आली. यासंदर्भात तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची जैन समाजाच्या प्रतिनिधींसह भेट घेऊन जैन समाजाच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचविणार असल्याचे आश्वासन भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी दिले. या मोर्चात देवेंद्र सागर महाराज, विराग सागर , विनम्र सागर महाराज, आचार्य कलाप्रभ सागर सूरीश्वर महाराज, अमोधकिर्ती महाराज, आमदार मंगलप्रभातलोढा, राज पुरोहित, अतुल शहा, नगरसेविका ज्योत्स्ना शहा, वीणा शहा, राम कदम, भारत जैन तीर्थक्षेत्र समितीचे अध्यक्ष आर के जैन आदी सहभागी झाले होते.