प्राचीन मंदिर शिलाहार-यादवकालीन असल्याचा कयास

पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी व गोरेगाव स्थानकांदरम्यान नव्याने सुरू होऊ घातलेल्या रेल्वे स्थानकाचे नाव ‘राम मंदिर’ असावे की ‘ओशिवरा’ यावरून वादाचे मोहोळ उठलेले असताना, राम मंदिराच्या आवारात असलेले शिवमंदिर हे राम मंदिराच्या किमान आठ शतकांपूर्वीचे असल्याचे पुरावे समोर आले आहेत. त्यामुळे या नावासमोर नवे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शिवमंदिराच्या प्राचिनत्वाचे पुरावे पाहता या स्थानकास शिवमंदिर असे नाव द्यावे, अशी भावनाही व्यक्त होत आहे!

नव्या स्थानकाजवळच्या परिसराला राम मंदिर असे संबोधले जात असल्याने तेच नाव या स्थानकाला देण्याची भूमिका सरकारने घेतली होती. हे मंदिर १९व्या शतकाच्या आधी बांधल्याचा आधार सरकारने घेतला होता. या राममंदिराला लागूनच शिवमंदिर आहे. या मंदिरामागे जुन्या दगडी मंदिराचे अवशेष आजही पडलेले दिसतात. अनेक वर्षांपूर्वीपर्यंत मंदिराच्याच परिसरामध्ये गधेगाळही अस्तित्वात होते. पूर्वीच्या काळी राजाने दान केलेल्या जमिनीच्या माहितीसाठी अशाप्रकारचे गधेगाळ कोरून घेतले जात असत. त्यावर दान दिलेल्या जमिनीची माहितीही कोरलेली असते. गोरेगावचा हा गधेगाळ मात्र अतिशय पुसट झालेला आहे, त्यामुळे तो वाचता येत नाही.

या शिवमंदिराशेजारीच १९व्या शतकातील राम मंदिर उभे आहे. त्यातील मूर्ती संगमरवरी दगडातून अलीकडच्या काळात घडवल्याचे स्पष्ट दिसते. तुलनेने शिवमंदिरातील शिवलिंग व नंदी हे अधिक प्राचीन आहेत. राम मंदिराचे व्यवस्थापन हे परंपरागतरीत्या सोमवंशी पाठारे क्षत्रिय (पाचकळशी) समाजाकडून पाहिले जाते. हा समाज जवळपास एक हजार वर्षांपूर्वी मुंबईत स्थलांतरीत झाल्यानंतर त्यांनी अनेक मंदिरांची उभारणी केली. या राम मंदिराचे व्यवस्थापन हे या समाजातील कै. हरिश्चंद्र व भिकोबा गोरेगावकर यांच्याकडून पाहण्यास १८७२च्या

काळात सुरुवात झाली होती. सन १८९६ मध्ये मुंबईत प्लेगची साथ आल्यानंतर ग्रँटरोड, गावदेवी येथून ही मंडळी गोरेगाव येथे वास्तव्यास आली. त्यावेळेस त्यांनी या प्राचीन शिवमंदिराच्या परिसराची निवड केली. त्यानंतर त्यांनी सन १८९७ मध्ये राम मंदिराचा जीर्णोद्धार केला, अशी माहिती मंदिराच्या विश्वस्त शैला पाठारे यांनी दिली.

या संदर्भात बोलताना ज्येष्ठ पुरातत्त्वज्ज्ञ डॉ. अरिवद जामखेडकर म्हणाले की, एखाद्या ठिकाणी माणूस नव्याने वस्ती करण्यास येतो, त्यावेळेस त्यापूर्वी पावन भूमी किंवा पुण्यभूमी असलेल्या ठिकाणाचीच निवड तो करतो, असे पुरातत्त्वशास्त्रात जगभर अनेकदा सिद्ध झाले आहे. त्यामुळेच गोरगावकर यांनी आधीची पुण्यभूमी म्हणजेच शिवमंदिर असलेल्या ठिकाणाची निवड करणे हे साहजिक ठरते. शिलाहार काळात बरीच शिवमंदिरे उभी राहिल्याचा उल्लेख करून, मंदिराच्या अवशेषांबाबत ते प्रत्यक्ष पाहिल्यावर अधिक बोलता येईल, असे त्यांनी नमूद केले.

पुरावे काय?

मंदिराच्या परिसरात सापडलेले शिवमूर्तीचे मुख आणि इतर काही अवशेषांवरून हे मंदिर शिलाहार-यादव कालीन असावे, असा संशोधकांचा कयास आहे. पुरातत्त्व अभ्यासक संदीप दहिसरकर यांनी सन २०१२ मध्ये केलेल्या गवेषणामध्ये त्यांना सर्वप्रथम हे अवशेष आढळले होते. एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या जर्नलमध्ये अशा प्रकारे नव्याने सापडलेल्या प्राचीन वस्तूंची नोंद केली जाते. या मंदिरातील या प्राचीन अवशेषांची नोंद २०१२-१३ सालच्या जर्नलमध्ये दहिसरकर यांच्या नावे प्रसिद्ध झाली आहे. त्यात काळ्या पाषाणातील प्राचीन शिविलग, समोर असलेला नंदी, प्राचीन मंदिरातील चार खांबाचे अवशेष, एक किचक (मंदिराचे खांब तोलून धरणाऱ्या भारवाहकाचे शिल्प), खांब कोरणाऱ्या शिल्पकारांनी केलेल्या कोरतानाच्या खुणा असलेले काही खांब, एक छोटेखानी शिलालेख आणि काही नक्षीकाम केलेले अवशेष व गधेगाळ यांची नोंद करण्यात आली आहे.

शिवमुख, भारवाहक व शिविलग हे १०-११ व्या शतकातील असावे. खासकरून शिलाहाराच्या अखेरच्या कालखंडातील असे त्याच्या शैलीवरून लक्षात येते. शिलाहारांच्या कालखंडामध्ये आपल्याक़डे मोठय़ा प्रमाणावर शिवमंदिरे उभी राहिल्याचा इतिहास आहे. मात्र त्याच्या शेजारी पडलेले नक्षीकाम केलेले इतर अवशेष हे शिवमुखाच्या नंतरच्या कालखंडातील असावेत.

डॉ. कुमुद कानिटकर, मंदिरस्थापत्याच्या ज्येष्ठ अभ्यासक