विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत हालचाली सुरू असून, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी राज्यात मंत्रिपद स्वीकारावे, यासाठी भाजप नेतृत्वाकडून त्यांना गळ घालण्यात येत आहे. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आठवले यांनी राज्यात मंत्रीपद घेण्यास नकार दिला. भाजपने दिलेला शब्द पाळून केंद्रात मंत्रीपद द्यावे, असा आग्रह त्यांनी मुख्यमत्र्यांकडे धरला. मात्र मुख्यमंत्र्यांनी दिल्लीकडे बोट दाखवून हा विषय आपल्या अखत्यारीत नसल्याचे सांगून टाकले.
जुलैच्या पहिल्या आठवडय़ात मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजप आपल्या मित्रपक्षांना काही मंत्रिपदे देणार आहे. त्यात शिवसेनेच्या वाटय़ाला दोन आणि लहान पक्षांना दोन मंत्रिपदे जाण्याची शक्यता आहे.
दानवेंचे संकेत
मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या पावसाळी अधिवेशनापूर्वी होण्याचे संकेत भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी बदलापूर येथे बोलताना दिले आहेत. मित्रपक्ष, पक्षाला सहकार्य करणाऱ्या पक्षांच्या प्रतिनिधींबरोबरच भाजपच्या मंत्र्यांचा यात समावेश असेल. ज्या विभागात भाजपचे मंत्री नाहीत त्या विभागात  प्रतिनिधित्व देण्यात येईल, असेही दानवे म्हणाले. विस्तारात ठाणे जिल्ह्य़ात, कोकणात  विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.