केंद्र सरकारच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे वर्ष देशात ‘समरसता वर्ष’ म्हणून साजरे करण्यास रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी विरोध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तसे पत्र पाठविले असून, १२५ वे जयंती वर्ष हे ‘समता वर्ष’ म्हणूनच साजरे करावे, अशी त्यांनी मागणी केली आहे.
१४ एप्रिल २०१६ ला डॉ. आंबेडकरांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती आहे. त्यानिमित वर्षभर अभियान राबविण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही संकल्पना आहे. समतेकडे जाण्यासाठी समाजात समरसता निर्माण करणे आवश्यक आहे, ही भूमिका घेऊन मंच काम करीत आहे; परंतु संघपरिवाराचाच एक भाग असलेल्या भाजपकडून राज्यसभेची खासदारकी मिळवणाऱ्या आठवले यांच्या अध्यक्षतेखाली तीन दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत याला विरोध करण्याचा निर्णय झाला.