पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांच्या केंद्रात मंत्री होण्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेले रावसाहेब दानवे मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्या जागेवर आठवले यांची वर्णी लागली जाईल, अशी चर्चा आहे.
  भाजप-शिवसेनेबरोबर युती केल्याच्या बदल्यात आठवले यांनी दोन्ही पक्षाकडे राज्यसभेची खासदारकी मागितली होती. शिवसेनेने त्यांची मागणी मान्य केली नाही. मात्र लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दलितांची मते मिळविण्यासाठी भाजपने आठवले यांना राज्यसभेवर निवडून दिले. लोकसभा निवडणुकीत केंद्रात सत्तांतर होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आले. आठवले यांनी त्याच वेळी केंद्रात मंत्री करण्यासाठी तगादा लावला. पुढे विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने आठवले यांना तसे आश्वासन दिले होते. त्यांनंतर केंद्रात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, मात्र आठवले यांची मंत्रिपदी वर्णी लागली नाही. त्यामुळे आठवले आणि त्यांचे कार्यकर्ते भाजपवर नाराज आहेत.
मध्यंतरी राज्यात कॅबिनेट मंत्रिपद घेण्याचा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठवले यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला होता; परंतु आपणास केंद्रातच मंत्रिपद हवे, असा त्यांनी हट्ट धरला. त्यामुळे केंद्रातही मंत्री नाही व राज्यातही सत्ता नाही, अशी रिपाइंची अवस्था झाली. या पाश्र्वभूमीवर संसदेचे अधिवेशन सुरू असताना मंगळवारी आठवले यांनी पंतप्रधानांची भेट घेतली.

अन्य मागण्या
भेटीदरम्यान आठवलेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिल जमीन हस्तांतरणाचे विधेयक संसदेत मंजूर करावे, शासकीय सेवेत मागासवर्गीयांना पदोन्नतीत आरक्षण मिळावे, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, अशा मागण्या केल्या. त्याच वेळी केंद्रातील मंत्रिपदाबाबतही मोदी-आठवले भेटीत चर्चा झाल्याचे समजते.