पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यासह आठ आमदारांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत या वर्षांअखेर संपुष्टात येत आहे. पुन्हा आमदारकी मिळविण्याकरिता रामदासभाईंना ‘मातोश्री’चा आशीर्वाद मिळवावा लागणार आहे, तरच त्यांचे मंत्रिपद टिकू शकेल.
विधान परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून आलेल्या आठ आमदारांची मुदत या वर्षांअखेर संपुष्टात येईल. मुंबई महापालिकेतून रामदास कदम आणि भाई जगताप (काँग्रेस) हे दोघे निवडून आले आहेत. महापालिकेतून निवडून येण्याकरिता पहिल्या पसंतीच्या ७५ मतांची आवश्यकता आहे. शिवसेनेकडे त्यापेक्षा जास्त मते असल्याने शिवसेनेचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. दुसऱ्या जागेकरिता चुरस होईल. मनसेची भूमिका निर्णायक ठरू शकते. काँग्रेसचे ५२ नगरसेवक असले तरी २० पेक्षा जास्त मते बाहेरून मिळवावी लागतील.
रामदास कदम सध्या शिवसेनेचा किल्ला विधिमंडळात लढवितात. औरंगाबादमध्ये शिवसेनेची सत्ता पुन्हा येण्यात पालकमंत्री म्हणून रामदासभाईंची भूमिका महत्त्वाची होती, असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. २००९च्या निवडणुकीत चिपळूण-गुहागर मतदारसंघात भास्कर जाधव यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागल्याने रामदासभाईंनी गेल्या वर्षी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे धाडस केले नसावे.

आमदारांची मोर्चेबांधणी
माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक – काँग्रेस (नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था), अमरिश पटेल – काँग्रेस (धुळे-नंदुरबार), महादेव महाडिक – काँग्रेस (कोल्हापूर), गोपीकिसन बजोरिया – शिवसेना (बुलढाणा-अकोला-वाशिम), दीपक साळुंखे – राष्ट्रवादी (सोलापूर), अरुण जगताप – अपक्ष (नगर) या आमदारांची मुदत संपत आहे. पुन्हा निवडून येण्यासाठी विद्यमान आमदारांनी तसेच अन्य इच्छुकांनी आतापासूनच मतांची जुळवाजुळव सुरू केली आहे.