कोकणात नारायण राणे समर्थक-विरोधकांमध्ये सुरू असलेल्या धुमशानीची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घेतली असून मतदारसंघाबाहेरील समर्थक-विरोधकांना जिल्ह्य़ाबाहेर काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनास देण्यात आल्या आहेत.
नारायण राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दीपक केसरकर यांच्यात वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात तणावाचे वातावरण आहे. आयोगातील उच्चपदस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अहवाल मागवून परिस्थितीचा आढावा घेतला. कोकणातील वादामुळे मुंबईतील अनेक राणे समर्थक कार्यकर्ते सिंधुदुर्गात गेले आहेत. त्यांच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये, याची काळजी पोलीस प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. त्यासाठी पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे. सध्या तेथे सारे काही सुरळीत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून आयोगाला कळविण्यात आले आहे.
मात्र खबरदारी म्हणून मतदारसंघाबाहेरील राजकीय नेते, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून बाहेर पडण्याच्या सूचना पोलीस प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत. मतदारसंघाबाहेरील प्रभावी नेते, कार्यकर्ते यांना मतदानाआधी मतदारसंघाबाहेर पडण्याच्या सूचना प्रत्येक निवडणुकीत दिल्या जातात. त्यानुसार येथेही पोलीस प्रशासनाकडून मतदारसंघाबाहेरील व्यक्तींना बाहेर काढले जात आहे.