रावसाहेब दानवे यांचे प्रतिपादन

पनवेलमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून भिवंडी व मालेगावमध्ये संख्याबळ वाढल्याने ग्रामपंचायत ते संसद पातळीवर भाजपच पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्याचे पुन्हा सिध्द झाले असल्याचे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी केले.

भाजपने मित्रपक्षांच्या मदतीने भिवंडीत आठवरुन २९ जागांपर्यंत मजल मारली असून मालेगावमध्ये खाते उघडून नऊ जागाजिंकल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्य़ातील नागभीड नगरपरिषदेत भाजपचा नगराध्यक्ष विजयी झाला असून १७ पैकी नऊ तर रेणापूरमध्ये १७ पैकी आठ जागाजिंकल्या आहेत. नेवासा नगरपरिषदेतही भाजपचा नगराध्यक्ष होईल. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्याच बाजूने जनतेने पुन्हा कौल दिल्याचा दावा दानवे यांनी केला आहे.

२०१९ च्या निवडणुकीत भाजप २८२हून अधिक जागा मिळविणार पक्षाध्यक्ष शहा यांचा विश्वास

नवी दिल्ली : सत्तारूढ भाजपच्या विरोधात विरोधी पक्ष व्यापक आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न करीत असून त्यांनी वाटेत कितीही अडथळे निर्माण केले तरी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजप सध्याच्या २८२ पेक्षाही अधिक जागांवर विजयी होईल, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला.

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये प्रतिस्पध्र्याचा केलेला पराभव आणि पश्चिम बंगाल, तेलंगणा, ओदिशा आणि केरळमध्ये पक्षाच्या कामगिरीत झालेली सुधारणा यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या शहा यांनी, २०१४च्या निवडणुकीपेक्षाही २०१९ मध्ये अधिक लक्षणीय विजय संपादन करण्याचा विश्वास व्यक्त केला.

लोकसभेच्या पुढील निवडणुकीला अद्याप दोन वर्षे आहेत आणि कोणताही विरोधी पक्ष आव्हान निर्माण करू शकतो, परंतु भाजपला अधिक लक्षणीय यश मिळेल याची आपल्याला खात्री असल्याचे शहा म्हणाले. काँग्रेस आणि प्रादेशिक पक्ष भाजपला आव्हान देऊ शकतात का, असे शहा यांना विचारले असता त्यांनी वरील विश्वास  व्यक्त केला.