मुंब्रा येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या दिनेश कृष्णा यादव (२६) या सुरक्षारक्षकास ठाणे न्यायालयाने शनिवारी पाच वर्षे सक्तमजूरीची शिक्षा सुनावली. त्यास काही कारणास्तव न्यायालयात हजर करण्यात येत नसल्यामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ही सुनावणी घेण्यात आली. जिल्ह्य़ात अशाप्रकारे पहिल्यांदाच शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणातील पिडीत मुलीने एका बालकास जन्म दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता.
मुंब्रा परिसरातील एका इमारतीत पिडीत मुलगी राहत असून ती घटनेच्यावेळी नववीमध्ये शिकत होती. त्यावेळी तिचे वय साडेतेरा वर्षे होते. तिच्या इमारतीमध्ये दिनेश यादव सुरक्षारक्षकाचे काम करीत होता. सप्टेंबर २०११ मध्ये त्याने तिला इमारतीच्या गच्चीवर नेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतरही त्याने तिच्यावर अशाप्रकारे बलात्कार केला. त्यामुळे ही पिडीत मुलगी गर्भवती राहिली. तिने मे २०१२मध्ये एका बालकास जन्म दिला. त्यावेळी हा प्रकार उजेडात आला होता. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दिनेशला अटक केली होती.
दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी ठाणे न्यायालयाच्या अतिरीक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. विरकर यांच्या समोर झाली.न्यायालयात सहाजणांची साक्ष घेण्यात आली. डीएनए अहवालामध्ये बालक त्याचेच असल्याचे स्पष्ट झाले होते. न्यायालयात सादर करण्यात आलेले साक्षीपुरावे तसेच डीएनए अहवालास ग्राह्य़ मानून न्यायधीश विरकर यांनी दिनेशला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली,